पारशी समाजासाठी नवरोज हा सण श्रद्धेचे प्रतीक आहे. नवरोज हा दोन पारसी शब्द नव आणि रोजपासून बनलेला आहे, याचा अर्थ नवीन दिवस. म्हणजेच पारसी समाजाच्या नवीन वर्षाची सुरुवात ‘नवरोज’च्या सणाने होते.
इराणी दिनदर्शिका देखील या दिवसापासून सुरू होते. पारशी समाजात नवरोज हा सण गेल्या 3,000 वर्षांपासून साजरा केला जातो. या दिवशी पारशी समाजबांधव संपूर्ण कुटुंबासह या उत्सवात सहभागी होतात, एकमेकांसोबत आपला आनंद वाटून घेतात.
देशातील अनेक राज्यांमध्ये पारशी समुदाय वसलेला आहे. इंग्रजी कॅलेंडरमध्ये वर्ष 365 दिवसांचे असले तरी पारशी समाजाचे लोक 360 दिवसांचे वर्ष मानतात. उरलेले पाच दिवस गाथाच्या स्वरूपात साजरे केले जातात.
गाथा म्हणजे पाच दिवस जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या पूर्वजांची आठवण करतात. वर्षातील शेवटचे पाच दिवस गाथा म्हणून साजरे केले जातात. पारशी इतिहास अन्य काही बाबतीतही खास आहे. चला तर, जाणून घेऊया नवरोज सणाबाबत.
नवीन वर्षाची कथा काय आहे?
नवरोज किंवा जमशेद-ए-नवरोज हा सण झोराष्ट्रियन राजा जमशेद यांच्यानावाने सुरु करण्यात आला. त्यांना पारशी किंवा शहंशाही दिनदर्शिका तयार करण्याचे श्रेय देखील दिले जाते. पौराणिक कथेनुसार, जमशेदने जगाला सर्वनाशातून वाचवले.
राजा जमशेद यांनी या दिवशी सिंहासन स्वीकारले होते, तेव्हापासून हा दिवस पारशी समाजासाठी नवीन वर्ष म्हणून साजरा केला जाऊ लागला. पारशी समाजाच्या मान्यतेनुसार, या दिवशी राजा जमदेशची विशेष पूजा केल्याने कुटुंबात सुख आणि समृद्धी येते.
भारतात नवरोज सण
पारशी समाजाची लोकसंख्या देशातील महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये जास्त आहे. अशा स्थितीत नवरोजचा उत्सव विशेषतः या राज्यांमध्ये दिसून येतो. लोक त्यांच्या पारंपारिक पोशाखात एकमेकांना भेटतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.
घरे सुशोभित केली जातात. स्वादिष्ट अन्न आणि मिठाई तयार केली जातात, लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. पूजास्थळांमध्ये विशेष पूजा केली जाते. फळे आणि फुले अर्पण केली जातात. कुटुंब, समाज आणि देशाच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते.