जालना – जालन्यातील अंबड तालुक्यात ओबीसी समाजाचा मोठा मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रत्येक पक्षाचे ओबीसी नेते आले होते. मात्र या मेळाव्याला पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या. त्याचे कारण समोर आले आहे. पंकजा मुंडे मेळाव्याला उपस्थित न राहिल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी त्यामागील कारण सांगितले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, ओबीसी आरक्षण बचाव सभेसाठी जायला माझ्या पक्षाने मला परवानगी दिली नाही.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांनी दाखवलेल्या मार्गावरच मी सध्या काम करत असून माझं राजकारण हे गरिबांसाठी आणि वंचितांसाठी आहे. मी दोन जातींमध्ये कधीच भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणार पण नाही. मला ओबीसीच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी आमंत्रणाची गरज नसून मी बहुजनांच्या बाजूने आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी नेत्यांची जाहीर सभा झाली. ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये यासाठी सर्वात आधी मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना इतर ओबीसी नेत्यांचा देखील पाठिंबा मिळाला. जालन्यातील सभेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर जरांगे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर आता राज्यात छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील, ओबीसी विरुद्ध मराठा असे वातावरण पाहायला मिळत आहे.