मुंबई : महिनाभरापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर झाले नव्हते. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर काल रात्री उशिरा पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे.
मागच्या महिनाभरापासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील करण्यात आली. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा बीडचं पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र धनंजय मुंडेना पालकमंत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आले.
अजित पवारांकडे बीडचे पालकमंत्रीपद
अजित पवारांकडे पुणे बरोबरच बीडचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर पंकजा मुंडेकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले.
धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद कोणी नाकारलं?
धनंजय मुंडेंनी बीडमध्ये प्रदीर्घकाळ काम केलं आहे. कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद द्यायाचं? याचा निर्णय महायुतीच्या तीन्ही पक्षातील प्रमुखांनी बसून निर्णय घेतला असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
बीडची सध्याची स्थिती पाहून मीच दादांना विनंती केली, बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी घ्यावी म्हणून . जसा पुण्याचा विकास झाला तसाच बीडचाही व्हावा. ही माझी भावना आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.