भोकरदन : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी फोटोमध्ये येण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारून बाजूला केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी रावसाहेब दानवेंवर टीकेची झोड उठवली होती. या सर्व प्रकारावर शेख हमद या कार्यकर्त्याने स्पष्टीकरण दिले आहे.
रावसाहेब दानवे आणि माझी 30 वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांचा शर्ट अडकल्याचे मी तो व्यवस्थित करण्यासाठी पुढे गेलो होतो. पण त्यांना ते नीट न समजल्याने आणि त्यांच्या हातात पुष्पगुच्छ असल्याने त्यांनी मला मिश्किलपणे बाजूला सारले, असे शेख हमद म्हणाले.
मी शेख हमद. मी रावसाहेब दानवे यांचा जवळचा मित्र आहे. आमची 30 वर्षांपासूनची मैत्री आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने विचारात घेतला जात आहे. आमच्यात असे काही नाही. लोक देखील कापड्याच्या चिंधीला साप बनवत आहेत. दानवे घरातून बाहेर आले असता, त्यांचा शर्ट पाठीमागे अडकला होता. मी त्यांच्या बाजुलाच उभा होतो.
त्यामुळे मी त्यांचा शर्ट व्यवस्थित करण्यासाठी पुढे गेलो. पण दानवे साहेबांना ते समजले नाही. त्यांच्या हातात पुष्पगुच्छ होता. त्यामुळे त्यांनी मिश्किलपणे मला लाथ मारत बाजूला सारले. व्हायरल व्हिडिओत जे सांगत आहेत, असे काही घडलेले नाही, असे स्पष्टीकरण हमद शेख यांनी दिले.