इटलीत “कहर’ का झाला?

जगाला हादरवून सोडणाऱ्या करोना विषाणूंचा सर्वाधिक प्रकोप इटलीत झाला आहे. तेथील वर्तमानपत्रे या प्रकोपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांविषयीच्या शोकसंदेशांनी भरून वाहत आहेत, यावरूनच इटलीतील परिस्थितीची कल्पना करता येते. करोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या चीनच्या खालोखाल इटलीत आहे. जगभरात सुमारे दोन लाख व्यक्तींना बाधित करणाऱ्या करोनाचा प्रसार चीनपासून 7500 किलोमीटर दूर असलेल्या इटलीत एवढ्या झपाट्याने का झाला, या प्रश्‍नाचे उत्तर शोधल्यास अन्य देशांना सतर्क राहता येईल.

जगभरात सुमारे 1 लाख 95 हजारांहून अधिक लोकांना करोना विषाणूची लागण झाली असल्याची अधिकृत आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जारी केली आहे. कोविड-19 या अत्यंत खतरनाक विषाणूंचा फैलाव चीनच्या वुहान शहरापासून सुरू झाला आणि जगभर पोहोचला. आजमितीस अमेरिकेत या विषाणूंमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या शंभरावर पोहोचली आहे. परंतु चीनच्या खालोखाल करोनाचा फैलाव झाला तो इटलीत. इटलीत 2500 पेक्षा जास्त मृत्यू करोनामुळे झाले आहेत. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी मृतांचा आकडा 2503 असल्याचे अधिकृतपणे सांगितले आहे.

31 हजार 506 लोकांवर इटलीत उपचार सुरू असून, सुमारे 3000 जणांना वाचविण्यात यश आले आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा 3000 पेक्षा अधिक असून, त्याखालोखाल या आजाराने इटलीत सर्वाधिक बळी घेतले आहेत. चीनपासून इटली 2700 किलोमीटर दूर असूनसुद्धा तेथे या आजाराचा एवढ्या झपाट्याने फैलाव का झाला, या प्रश्‍नाचे उत्तर शोधल्यास अन्य देशांना सतर्क राहता येणार आहे. सुमारे सहा कोटी लोकसंख्या असलेल्या इटलीत 30 हजारांहून अधिक बाधित रुग्ण असणे तेथील भीषणता दर्शविणारे आहे. संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, रस्ते ओस पडले आहेत. घराघरात लोक घाबरून जगत आहेत. एकाच दिवसात करोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू होण्याची घटनाही इटलीतच घडली. 13 मार्च या एकाच दिवशी 368 जणांचा बळी इटलीत करोनामुळे गेला.

चीनखालोखाल इतर कोणत्याही देशापेक्षा इटलीत या आजाराचा फैलाव अधिक वेगाने होण्यामागे अनेक कारणे आहेत. इटलीत तयार होणाऱ्या चामड्याच्या वस्तूंना जगभरात मोठी मागणी आहे. आकर्षक बॅग बनविणारे परादा, गुची असे इटलीतील लोकप्रिय ब्रॅंड्‌स जगभरात प्रसिद्ध आहेत. इटलीतील उत्पादनांना चीनमध्ये मोठी मागणी आहे. एवढेच नव्हे तर इटलीतील वस्तूंना चीनमध्ये असलेल्या मागणीत दरवर्षी तब्बल 21.3 टक्‍क्‍यांची वाढ होते आहे. परंतु इटलीच्या लोकसंख्येत सर्वांत मोठा गट वयोवृद्ध व्यक्तींचा आहे. युरोपातील सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक इटलीत राहतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे तेथील अनेक उत्पादकांनी चीनमध्ये आपल्या वस्तूंची निर्मिती सुरू केली आहे.

2018 च्या जानेवारीपासून ऑक्‍टोबरपर्यंत 12.3 कोटी किलो वजनाची चामड्याची उत्पादने चीनमध्ये आली. त्यांच्या निर्मितीत सर्वाधिक 60 टक्के वाटा चीनचा होता. एवढेच नव्हे तर इटलीतील अनेक कंपन्यांमध्ये चीनमधील कर्मचारी कार्यरत आहेत. अनेक चिनी कंपन्यांनीही फॅशनच्या दुनियेत मोठी मजल मारून इटलीत बस्तान बसविले आहे. उत्तर इटलीतील कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले बहुतांश चिनी कर्मचारी वुहान किंवा वेन्‌झोई प्रांतातील आहेत. एवढेच नव्हे तर वुहान ते इटली थेट विमानसेवाही आहे. याच कारणांमुळे इटलीत करोनाचा संसर्ग जगातील इतर देशांच्या तुलनेत झपाट्याने झाला.

करोना विषाणूचा चीनमध्ये फैलाव होताच एक गोष्ट स्पष्ट झाली की, गंभीर आजारांनी ग्रस्त किंवा वयोवृद्ध लोकांना करोनाचा प्रादुर्भाव लगेच होतो. चीनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमधील 80 टक्के लोक 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. इटलीत 65 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकांची संख्या अधिक आहे. इटलीतील नागरिकांचे सरासरी वय 43.1 वर्षे आहे. याखेरीज इटलीत करोनाचा प्रसार झपाट्याने होण्यास तेथील प्रदूषण आणि लोकांची धूम्रपानाची सवयही कारणीभूत ठरली आहे. युरोपातील 100 प्रदूषित शहरांपैकी 24 शहरे इटलीतील आहेत. याखेरीज तेथील 21 टक्के लोक धूम्रपान करतात. अमेरिकेत लोकसंख्येच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांची संख्या 14 टक्के आहे. त्यामुळे इटलीतील लोकांना श्‍वसनासंबंधीचे आजार जडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेही करोनाचा फैलाव इटलीत वेगाने झाला.

इटलीत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात करोनाचा संशय असलेले तीन रुग्ण निदर्शनास
आले होते. यातील दोघेजण चिनी पर्यटक होते. प्रशासनाने या तीन जणांना स्वतंत्र ठेवले आणि त्यांनी ज्यांच्या गाठीभेटी घेतल्या त्यांचाही शोध घेतला. परंतु त्यामुळे या आजाराच्या फैलावाला अटकाव करण्यात यश आले आहे, असा प्रशासनाचा गैरसमज झाला. त्याच वेळी लोम्बार्डी प्रांताकडे त्यांचे सपशेल दुर्लक्ष झाले. उत्तर इटलीत असलेल्या या प्रांतात करोना विषाणू हळूहळू पसरत चालला होता. हा प्रांत इटलीची आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर सुरू असते. या प्रांतात सरकार आणि आरोग्यसेवा प्रशासनात ताळमेळ बिलकुल राहिला नव्हता. त्यामुळे लोम्बार्डीसह व्हेनेटो आणि एमिलिया रोमागा हे विभाग करोनाच्या विळख्यात अडकत गेले. इटलीतील करोनाग्रस्तांमधील 85 टक्के याच विभागातील असून, 92 टक्के मृत्यूही याच विभागात झाले आहेत.

करोनाच्या भयामुळे आता समोरासमोर भेट झाल्यास अभिवादन करण्याची “नमस्ते’ ही भारतीय पद्धत हळूहळू जगात सर्वत्र स्वीकारली जात आहे. परंतु अभिवादनाची इटलीतील शैली मोठी अजब आहे. समोरासमोर भेटणाऱ्या व्यक्ती एकमेकांच्या दोन्ही गालांचे चुंबन घेऊन अभिवादन करतात. त्यामुळे लोक एकमेकांच्या निकट संपर्कात येण्याचे प्रमाणही इटलीत अधिक आहे. एक करोनाबाधित रुग्ण अन्य तिघांना “प्रसाद’ देऊ शकतो असे गृहित धरले गेले आहे. अशा प्रकारे तिघांपासून नऊ जणांना आणि नऊ जणांपासून 27 जणांना या दराने करोनाबाधित रुग्णांची संख्या इटलीत वाढतच गेली. 38 वर्षांचा एक पॉझिटिव्ह रुग्ण फेब्रुवारीत डॉक्‍टरांना आढळून आला. तो अनेक रुग्णालयांमधून तत्पूर्वी जाऊन आला होता. अनेकांच्या संपर्कातही तो आला होता; परंतु तो चिनी नसल्यामुळे त्याची चाचणी लवकर झाली नव्हती. फेब्रुवारीत त्याला करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही सुमारे 36 तासांनी त्याला “आयसोलेशन वॉर्ड’मध्ये भर्ती करण्यात आले. अशा घटनांमुळेही करोनाचा प्रसार इटलीत वेगाने झाला.

इटलीमध्ये एकीकडे करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना दुसरीकडे हा देश रुग्णालयातील खाटांच्या कमतरतेच्या समस्येने ग्रासलेला आहे. रुग्णांची संख्या खाटांच्या संख्येपेक्षा कितीतरी असण्याची वेळ बहुधा युद्धाच्या वेळी येते; परंतु इटलीत शांतिकाळात अशी परिस्थिती पाहायला मिळाली. लोम्बार्डी प्रांताच्या उत्तरेकडे असलेल्या एका रुग्णालयातील डॉक्‍टरने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, श्‍वसनाचा त्रास होत असलेल्या 80 ते 95 वर्षांच्या रुग्णांकडे नाइलाजाने दुर्लक्ष करावे लागले. वास्तव कटू असले तरी आम्ही चमत्कार करण्याच्या स्थितीत नाही, असे या डॉक्‍टरचे शब्द होते. दुर्दैवाने इटलीत करोनाचा प्रसार इतक्‍या वेगाने झाला आहे की, कुणाला वाचवायचे आणि कुणाकडे थोडेफार दुर्लक्षच करायचे, असा निर्णय घेण्याची वेळ डॉक्‍टरांवर येऊन ठेपली. 12 मार्चपर्यंत 15000 बाधित रुग्णांपैकी 1000 लोकांनी प्राण गमावले होते. जपानपाठोपाठ इटलीत वयोवृद्ध लोकांची संख्या सर्वाधिक आहे आणि म्हणूनच जर करोनासारख्या घातक विषाणूंचा फैलाव झाला तर चीनखालोखाल धोका इटलीलाच आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघानेही म्हटले आहे.

मार्चच्या सुरुवातीला इटालियन सोसायटी ऑफ ऍनस्थेशिया, ऍनल्जेसिया, रेसीटेशन अँड़ इन्टेन्सिव्ह थेरपी या संघटनेने नैतिक शिफारशी जारी केल्या. अगदीच असाधारण स्थितीत रुग्णाला आयसीयूमधील बेड द्यायला हवा, म्हणजेच सर्वांवर उपचार करणे रुग्णालयांना शक्‍य नाही, असाच सल्ला डॉक्‍टरांना देण्याचा या संघटनेचा हेतू होता. “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ हे तत्त्व न अवलंबिता, उपचारांनंतर जीवित राहण्याची शक्‍यता कोणत्या रुग्णांबद्दल अधिक आहे, याचा अंदाज घेऊन डॉक्‍टर आणि नर्स यांनी निर्णय घ्यावा, अशी सूचनाही करावी लागली. कोणावर उपचार करावेत आणि कोणावर करू नयेत, याबाबत संघटना काहीही सुचवीत नसून, उपचारांचा फायदा सर्वाधिक कोणत्या रुग्णाला होईल, याचा शोध घेऊन तिथे लक्ष केंद्रित करण्याचा हा सल्ला आहे, असे संघटनेने म्हटले होते. इटलीतील रुग्णालयांमधील आयसीयू विभागात सुमारे 5200 बेड असून, हिवाळ्यात श्‍वसनाशी संबंधित आजार बळावत असल्यामुळे रिकामे बेड उपलब्ध होणे अवघड असते. अशा स्थितीतच करोनाने हल्ला केला. लोम्बार्डी आणि व्हेनेटो प्रांतात मिळून 1800 आयसीयू बेड आहेत आणि तिथेच रुग्णसंख्या वाढत गेली. अखेर “जास्तीत जास्त प्रयत्न’ हेच सूत्र डॉक्‍टरांना स्वीकारावे लागले. हे अनुभव विचारात घेता, ज्या-ज्या देशांमध्ये करोनाचा फैलाव होत आहे, त्या-त्या देशांना अनेक धडे मिळू शकतात.

अमोल पवार
कॅलिफोर्निया

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.