आयपीएल 2025 साठी आरसीबीने त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. RCB ने कर्णधारपदाची धुरा युवा फलंदाज रजत पाटीदारच्या खांद्यावर सोपवली आहे. RCB च्या कर्णधारपदासाठी विराट कोहलीच्या नावाची चर्चा होती मात्र संघ व्यवस्थापनने कोहलीला डावलून रजत पाटीदारच्या खांद्यावर संघाची धुरा सोपवल्याने कोहलीचे फॅन्स नाराज झाले आहेत.
खरं तर आरसीबीच्या चाहत्यांपासून क्रिकेटप्रेमींना यंदाच्या वेळीस आरसीबीचे नेतृत्व विराट कोहलीच करेल,अशी आशा होती. पण आरसीबीने विराट कोहलीला धक्का देत रजत पाटीदारच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे आरसीबी संघात इतका अनुभवी खेळाडू आणि कर्णधार असताना देखील पाटीदार कर्णधार बनवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.
विराटच्या तुलनेत पाटीदार फारच ज्यूनिअर खेळाडू आहेत. मात्र या काही कारणांमुळे आरसीबीने यंदाच्या आयपीएलसाठी रजत पाटीदारवर विश्वास दाखवला आहे. यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात…
1) स्थानिक पातळीवर मध्य प्रदेश संघाचे नेतृत्व
आरसीबीचा नवा कर्णधार रजत पाटीदार हा स्थानिक पातळीवर मध्य प्रदेश संघाचे नेतृत्व करतो. कर्णधार म्हणून त्याने मध्य प्रदेशसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशचे नेतृत्व करताना, त्याने संघाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 च्या अंतिम फेरीत नेले आणि अंतिम फेरीत संघासाठी उपयुक्त फलंदाजीही केली होती.
2) आयपीएलमध्ये संघ अडचणीत असताना महत्वपूर्ण खेळी
रजत पाटीदारने आयपीएलमध्ये अनेक वेळा आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत विजय मिळवून दिला आहे. ज्या ज्या वेळेस संघ संकटात होता, त्या त्या वेळेस त्याने मैदानात उतरून पराक्रमी खेळी केली आहे. जेव्हा रजत पाटीदार मैदानावर असतो तेव्हा तो संपूर्ण संघाचे मनोबल कमी होऊ देत नाही आणि अशा प्रकारे संघाच्या कामगिरीची पातळी देखील पूर्वीपेक्षा जास्त वाढते.
3) रजत पाटीदारचा फिटनेस
रजत पाटीदार सध्या 31 वर्षांचा आहे आणि त्याची तंदुरुस्तीही चांगली आहे. अशा परिस्थितीत, व्यवस्थापनाकडे त्याच्याच फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे जो सुमारे 5-6 वर्षे सहजपणे संघाचे नेतृत्व करू शकतो. त्याच्या कर्णधारपदाच्या कौशल्याकडे पाहिल्यानंतर, क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की त्याच्यात इतक्या वर्षांपासून सुरू असलेला आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची क्षमता आहे.
रजत पाटीदार 2023 मध्ये आरसीबी संघाचा भाग झाला होता आणि त्याला या फ्रँचायझीने 20 लाखांना खरेदी केलं होतं. त्यानंतर 2024 मध्येही त्याच पगारावर खेळला होता, या दोन्ही सिझनमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. परंतु 2025 साठी त्याला या संघाने 11 कोटी रुपयांना कायम ठेवलं होतं. आता थेट कॅप्टन्सीची माळ त्याच्या गळ्यात पडली आहे.
आरसीबीला गेल्या 17 वर्षात एकदाही आयपीएल जिंकता आली नाही. रजत पाटीदार संघाला पहिली आयपीएल ट्रॉफी मिळवून देण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे तसेच पाटीदारच्या नेतृत्वात आता आरसीबी यंदाचा आयपीएलचा सीझन कसा खेळणार आहे? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.