इम्रानखान यांनी पुलवामा हत्याकांडाचा निषेध का केला नाही?

अमित शहा यांचा सवाल

नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध का केला काही, त्यावर त्यांनी का मौन पाळले असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. त्यांच्या या भुमिकेमुळेच त्यांच्यावर विश्‍वास ठेवता येत नाही असे त्यांनी म्हटले आहे. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते.

ते म्हणाले की दहशतवादाच्या विरोधात आमच्या सरकारने अत्यंत परिणामकार कारवाई केली असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच दहशतवादावर इतकी प्रभावी कारवाई आत्तापर्यंत झाली आहे. मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक दहशतवादी मारले गेले आहेत असा दावाही त्यांनी केला. दहशतवादाच्या संबंधात पाकिस्तानची भूमिका कायमच वादग्रस्त राहिली आहे असे नमूद करताना त्यांनी म्हटले आहे की इम्रान खान यांनी एकदा तरी पुलवामा हल्ल्याचा निषेध करणे अपेक्षित होते पण त्यावर त्यांनी सोयीस्कर मौन पाळले आहे.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने जी सुटका करण्याचा जो निर्णय घेतला तो भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचा विजय आहे असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सद्‌भावना आणि शांततेसाठी आपण अभिनंदन यांची सुटका करीत आहोत असे गुरूवारी त्या देशाच्या संसदेत बोलताना सांगितले होते. पण त्यांचा हा दावा अप्रत्यक्षरित्या फेटाळताना अमित शहा म्हणाले की पकडले गेल्यानंतर इतक्‍या कमी वेळात अभिनंदन यांची सुटका म्हणजे भारताच्या डिप्लोमसीचाच विजय आहे. त्यांची सुटका होंणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. जिनीव्हा करारातील तरतूदीनुसार त्यांची सुटका करणे त्यांच्यावर बंधनकारकच होते असे मत एअर मार्शल आर जी के कपुर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.