मुंबई : राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी माहिती समोर आली. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाल्याचे समोर आले. यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले.
यावर आता माध्यमांशी बोलतांना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट ही फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले,’शरद पवारांवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी अनेकदा विविध कारणांसाठी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता फडणवीसांनी देखील पवारांची भेट घेतली परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून, माहिती दिली आहे. “माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.” असे फडणवीस यांनी ट्विट केले आहे.