मुंबई – अंधेरीत होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपसह उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष देखील ठाकरेंसोबत आहे. तर नारायण राणे यांना भाजपकडून आगामी निवडणुकांसाठी मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे यावर भाष्य करताना निलेश राणे यांनी मुंबईवर भाजपाचा झेंडा लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
राणे साहेब हे आमदार होण्यापूर्वी 1985 ला चेंबूरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. साहेबांची सुरुवातच शाखाप्रमुख म्हणून मुंबईतून झाली.त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आजही मुंबईत आहे. असं निलेश राणे सांगतात. तसेच राणे साहेब 1990 ला आमदार झाले. मात्र त्यांनी कायम आपलं लक्ष मुंबईकडे ठेवलं होते .त्यामुळे पक्षाकडून त्यांना जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती ते पूर्व करतील. मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल याची मला खात्री आहे असं स्पष्ट मत एका वृत्तवाहिनीशी बोलताना निलेश राणेंनी व्यक्त केलं.
राष्ट्रवादीसह भास्कर जाधव यांच्यावर निशाणा
राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील हवेत गोळीबार करत असतात, असं निलेश राणे म्हणाले. तर सूडबुद्धीने गुन्हे दाखल झाले आहेत या भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपावर बोलताना राणे म्हणाले,भास्कर जाधव कार्टून आहे, तळ कोकणात आम्ही त्याला बैलचं म्हणतो,तो उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी बोलत असल्याची टीका यावेळी राणेंनी केली. तसेच आगामी काळात चिपळूणला येऊन सभा घेणार असल्याचे देखील निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.