“सर्वज्ञानी जनाब संजयजी राऊत,समीर वानखेडे बाबासाहेबांचे अनुयायी नसून मुस्लिम आहेत हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची एवढी घाई का?”

भाजप प्रदेशच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची सडकून टीका

मुंबई : आर्यन खान प्रकरणावरुन सध्या राज्यात  नवनवीन खुलासे आणि आरोप समोर येताना दिसत आहे. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि इतरांवर कारवाई करत ताब्यात घेण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. दरम्यान यावरुन विरोधी पक्षाकडून  राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील आता या प्रकरणात टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारले आहेत.

“सर्वज्ञानी जनाब संजयजी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुस्लिम आहे हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे ?,” अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे.

“महाराष्ट्रात बरेचसे महत्त्वाचे प्रश्न आहेत. जसे की कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळालेला नाही. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. आरोग्य विभागात घोटाळा होत आहे. एमपीएससीच्या तरूणांचे भविष्य अंधारात ढकललं जात आहे. रोज राज्यातील लहान मुली-महिला यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत. या सगळ्या विषयावरती आपल्याला भाष्य करायचं नाही. पण तुम्हाला एनसीबीसारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करायच आहे. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे,” अशी टीका भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

“नगरमध्ये हिंदुस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयचा घोषणा दिल्या आणि त्यांना विरोध करण्यांची डोकी फोडण्यात आली. उलट तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणाऱ्यांवरच कारवाई करते. यावर तुम्हाला बोलायचं नाही,” अशीही विचारणा त्यांनी केली. “जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पहायचा आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलिच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते असंही त्यांनी म्हटलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.