नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनाचे दर घटले आहेत. तसे असूनही भारतात पेट्रोलचे दर कमी का होत नाहीत, असा सवाल तृणमूल कॉंग्रेसने सोमवारी उपस्थित केला. मागील १० वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनाचे दर २४ टक्क्यांनी घटले. मात्र, भारतातील पेट्रोलचे दर त्या कालावधीत ३० टक्क्यांनी वाढले. याकडे तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी लक्ष वेधले.
ऑगस्ट २०१४ मध्ये कच्च्या इंधनाचा दर प्रतिपिंप १०२ डॉलर्स इतका होता. त्यावेळी भारतात काही ठिकाणी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७३ रूपये होता. ऑगस्ट २०२४ मध्ये कच्च्या इंधनाचा दर ७८ डॉलर्सपर्यंत खाली आला. मात्र, सध्या देशातील काही ठिकाणी पेट्रोलचा दर ९५ रूपये आहे. इंधन कंपन्यांना घसघशीत नफा मिळत आहे. मात्र, त्याचा लाभ सामान्य ग्राहकांना मिळू दिला जात नाही, अशी टिप्पणी त्यांनी सोशल मीडियावरून केली.
याआधी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे मार्चमध्ये देशातील पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये बदल करण्यात आला होता. त्यावेळी २ रूपयांनी दर कमी करण्यात आले होते.