झरीनशी लढायला मला कसली भीती? : मेरी कोम

नवी दिल्ली: युवा बॉक्‍सर खेळाडू निखत झरीनचा सामना करण्यास घाबरत नाही. माझी आजवरची कामगिरी हीच माझी ओळख असल्याने, मला कोणाची भीती वाटण्याचे काय कारण? अशा शब्दांत “सुपरमॉम बॉक्‍सर’ एमसी मेरी कोम यांनी झरीनचे आव्हान स्वीकारले आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या स्पर्धांमध्ये तिला पराभूत करणे ही केवळ औपचारिकता असेल, असेही मेरी कोम म्हणाली.

पुढील वर्षीच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी भारतीय संघात मेरी कोमची 51 किलो वजन गटात निवड जाहीर झाल्यानंतर उदयोन्मुख निखत झरीनने या निवडीला आक्षेप नोंदवत, आपली मेरी कोमबरोबर लढत घ्यावी आणि त्यात जी जिंकेल तिला स्पर्धेला पाठवावे, असे म्हटले होते.

बॉक्‍सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने असे सांगितले होते की, रशियामधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नुकत्याच झालेल्या कांस्यपदक जिंकण्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत मेरी कोमची निवड करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, या निर्णयाला झरीनने आव्हान दिले होते.

मेरी कोम म्हणाली की, माझ्या समावेशाचा निर्णय बीएफआयने घेतला आहे. मी नियम बदलू शकत नाही. मी फक्‍त कामगिरी करू शकते. ते जे काही ठरवतात मी त्या सोबत असेन. निखतला सामोरे जायला मी घाबरत नाही. “सॅफ गेम्स’पासून मी तिला बऱ्याच वेळा पराभूत केले आहे; पण ती मला आव्हान देतच राहिली आहे. तिला कोणत्याही सामन्यात पराभूत करणे ही फक्त औपचारिकता आहे. मी तिच्याविरुद्ध नाही. ती कदाचित भविष्यात चांगली खेळाडू ठरेलही. तिला अनुभव मिळायला हवा आणि उच्च स्तराच्या तयारीवर सध्या तिने लक्ष केंद्रित करावे. मी गेली 20 वर्षे संघर्ष करत आहे. आव्हान करणे सोपे आहे पण कामगिरी करणे अवघड आहे. शिवाय, ऑलिम्पिकमध्ये कोण पदक जिंकू शकेल, हेही बीएफआयला माहीत आहे.

महिलांच्या स्पर्धेबाबत बीएफआयने सांगितले होते की, रशियातील वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील केवळ सुवर्ण-रौप्य विजेत्यांचीच फेब्रुवारीमध्ये ऑलिम्पिक पात्रतांसाठी थेट निवड केली जाईल. तथापि, बीएफआयने आता झरीनच्या याचिकेवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात निवड समितीची बैठक बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीकडे क्रीडा विश्‍वाचे लक्ष लागून राहिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)