पंकजा मुंडे यांचा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सवाल
पुणे – पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या परळी मतदार संघात प्रचाराला कशासाठी? असा प्रश्न महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित करत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली.
पर्वती विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारासाठी वाळवेकर लॉन्स येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माधुरी मिसाळ, शिवसेनेचे बाळासाहेब ओसवाल, आरपीआयचे बाबुराव घाटगे व महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, संपूर्ण राज्यभरात महायुतीच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत विकासाची गंगा मतदारसंघांत पोहचवलेली आहे. त्यामुळे मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करुन आशीर्वाद देण्याची गरज आहे. मतदारांनी निवडणुकीत कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन मुंडे यांनी केले.