रस्त्याकडेची झाडे कोणाची?

– संजोग काळदंते

आपल्या निरनिराळ्या व्यावसायाची, संस्थेची जाहिरात लावण्यासाठी ज्या झाडांचा सर्रासपणे वापर केला जातो आहे, त्यामुळे ही महामार्गालगत असलेली झाडे नक्की कोणाची, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. असंख्य लोखंडी खिळे, चुका ठोकून महामार्गालगतच्या झाडांना लावलेले बॅनर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष केंद्रित करित आहेतच; परंतु त्या झाडाला खिळे ठोकून झालेल्या वेदनांकडे लक्ष देण्याबाबत संबंधितांकडून उदासीनताच आहे. वास्तविक ही झाडे वर्षानुवर्षे जुनी आहेत आणि अजूनही बहरलेली दिसतात.

अनेक वर्षे जशीच्या तशी आहेत. येथून जाणाऱ्या वाटसरूंना त्यांच्या सावलीमुळे विश्रांती मिळते आहे. मात्र, त्यांना ठोकलेले खिळे हे त्या झाडांचे आयुर्मान घटवणारे आहे, हे या झाडांवर जाहिराती लावणाऱ्यांना समजत नाही का, असे प्रश्‍न निर्माण होतो आहे. महामार्ग विभागाने केलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान अनेक झाडांची कत्तल झालेली आहे, त्याबदल्यात वृक्षलागवड करण्याचा नियम कितपत पाळला जातो आहे, हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे. नगर-कल्याण महामार्गावर अनेकांनी झाडांवर खिळे ठोकून आपआपल्या व्यवसायाच्या जाहिरातींचे फलक लावले आहेत. या सर्व प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याबाबत अनेक ठिकाणी चर्चा आहे.झाडांना मोठमोठे लोखंडी खिळे ठोकून पत्र्याचे फलक लावणे ही जणू फॅशनच झाली आहे. जिथे बघावे तिथे झाडाला लावलेले जाहीरातींचे फलक, झाडावर जागा नसेल तर फांद्या तोडून फलक लावण्यासाठी केलेली जागा आणि त्या जागी लावले जाणारे जाहिरात फलक अशा पद्धतीने जुन्नर तालुक्‍यातील रस्त्यांकडेच्या झाडांची जाहिरातदारांनी अक्षरशः वाट लावली आहे.

या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी संबंधित झटकत असले किंवा याबाबत त्यांना विसर पडला असेल तर ती जबाबदारी एक सुज्ञ नागरिक म्हणून आपली आहे. महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.