वडूज – भारतीय जनता पक्षाच्या खटाव तालुकाध्यक्षपदासाठी तालुक्यातील सात ते आठ जणांची नावे चर्चेत असून यापैकी भाजप तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे तालुक्यातील राजकीय गोटाचे लक्ष लागून राहिले आहे.
खटाव व माण तालुका भाजप अध्यक्षांच्या निवडीसाठी दहिवडी येथे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकत्यांची बैठक झाली.
बैठकीत बनपुरीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ देवकर- पाटील, पुसेगावचे भरतशेठ मुळे, पंचायत समितीचे सदस्य धनंजय चव्हाण, नगरसेवक अनिल माळी, डॉ. प्रशांत गोडसे, भाजपचे शहराध्यक्ष प्रदीप शेटे, प्रा. सदाशिव खाडे यांच्या नावाची चर्चा झाली. भरतशेठ मुळे गेली अनेक वर्षे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, पक्षपातळीवरील विविध कामांचा त्यांना चांगला अनुभव असल्याने यावेळी त्यांना संधी द्यावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. श्री.देवकर- पाटील बनपुरीचे सरपंच आहेत.
धनंजय चव्हाण कातरखटाव गणाचे पंचायत समिती सदस्य आहेत. वडूजचे नगरसेवक अनिल माळी यांनी काही वर्षे गावचे सरपंचपदही भूषविले आहे. प्रदीप शेटे भाजपचे शहराध्यक्ष असून नगरपंचायत, लोकसभा, विधानसभा निवडणूक व इतर आणीबाणीच्या काळात पक्षाबरोबर राहण्याची भूमिका त्यांनी कायम घेतली आहे. डॉ. प्रशांत गोडसे नेहमी वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपासतात. विधानसभा निवडणूक काळात त्यांनी आमदार गोरे यांच्याबरोबर राहण्याची खंबीर भूमिका घेतली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे विद्यमान तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा दहिवडी येथील बैठकीस उपस्थित राहू शकले नव्हते.
श्री. शहा यांनी वरिष्ठांशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली असल्याचे समजते. श्री. शहा यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतरच्या काळात नगरपंचायत, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला तालुक्यात चांगले यश मिळाले. गावपातळीवर बुथ रचना, पक्षाचे काम तळागाळात पोचविणे याशिवाय दुष्काळी परिस्थितीतही शहा यांनी अखिल भारतीय जैन समाज संघटनेच्यावतीने तालुक्यात जलसंधारण कामांसाठी मोठी मदत मिळवून दिली आहे. त्यामुळे शहा यांना पुन्हा संधी द्यावी, अशी समर्थकांची मागणी आहे.