वासुंदे परिसरात डंपरमधून सांडणाऱ्या खडीमुळे दुचाकीस्वार त्रस्त
वासुंदे – येथील पंचक्रोशीत स्टोन क्रशरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत असून, या “ओव्हरलोड’ खनिजाच्या वाहतुकीवर कोणाचीही वचक नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात स्थानिक दूरध्वनीवरून कल्पना देत असतात मात्र,वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई झालेली दिसत नाही.
पाटस (ता. दौंड) येथील बारामती फाटा ते वासुंदे येथील गुंजखिळा हा मार्ग पालखी महामार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र, गौण खनिज वाहतूक नियमापेक्षा जास्त प्रमाणात होत असल्यामुळे या मार्गाची पूर्णपणे दुर्दशा होत आहे. डंपरमधून नियमबाह्य होणाऱ्या खडी क्रसेंन्ड डस्ट वाहतुकीमुळे अनेकांना अपघाताचे बळी पडावे लागत आहे. मात्र, कुठेही चौकशी होत नाही किंवा कुठल्याही गाडीवर कारवाई होताना दिसत नाही. अपघात घडला की अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल होतो.नियमबाह्य वाहतुकीसंदर्भात उपविभागीय परिवहन कार्यालय, बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांच्याशी संपर्क साधला असता कॉल घेण्यास नकार आला.
पालखी महामार्ग की डंपर महामार्ग?
या मार्गाची पालखी महामार्गाऐवजी डंपर महामार्ग अशी ओळख बनत चालली आहे. शेकडो डंपर दिवस-रात्र येथून गौण खनिज वाहतूक करतात. मात्र कारवाई कुठेही नाही, त्यामुळे वाहतुकीचे नियम व दंडात्मक कारवाईही फक्त सर्वसामान्यासाठीच असते का, असा प्रश्न प्रवासी करीत आहेत.
नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या संबंधित वाहनांवर पोलिसांमार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच याबाबत नागरिकांनी आरटीओ यांच्याकडे तक्रार करावी.
– भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक, यवत
या मार्गावरून होणारी नियमबाह्य वाहतूक संबंधित विभागाने त्वरित बंद करावी. आम्हास स्थानिक प्रवाशांना येथून प्रवास करताना जीवितास धोका निर्माण होत आहे. ही वाहतूक त्वरित बंद न झाल्यास आगामी काळात प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
– विजय साळुंके, सामाजिक कार्यकर्ते, वासुंदे