विद्यमान आमदारांसमोर कडवे आव्हान; इच्छुकांची संख्या वाढल्याने महायुतीतही संघर्ष
– प्रकाश राजेघाटगे
बुध – विधानसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी काही दिवसच शिल्लक असताना सर्व पक्षांमधील इच्छुक कामाला लागले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्याने कोरेगावची जागा राष्ट्रवादीसाठी राहील, अशी आ. शशिकांत शिंदे यांना खात्री आहे, मात्र, ही जागा युतीमध्ये कुठल्या पक्षाकडे जाणार आणि उमेदवार कोण, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. काही असले तरी यंदा या मतदारसंघात “कॉंटे की टक्कर’ होणार हे निश्चित आहे.
भाजप – शिवसेना युतीत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना जास्त जागा लढवणार, असा अलिखित नियम होता. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीकडून हणमंतराव चवरे हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख उमेदवार होते; पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर बहुमत मिळवल्याने त्यानंतर सहा महिन्यात असलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर असलेली युती तोडली.
त्याचा फायदा भाजपला झाला आणि देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला. त्यानंतर भाजप नेत्यांनी पक्ष विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला. त्यात प्रथम कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महेश शिंदे हा उमदा तरुण गवसला. त्यांनीही पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ केला. गेल्या पाच वर्षात त्यांनी भाजप गावागावात पोहोचवला आहे. भाजपने स्थानिक पातळीवरील निवडणुका लढवल्या.
केंद्र व राज्य सरकारमुळे निधीची कमतरता कमी पडली नाही.त्यामुळे महेश शिंदे हेच विद्यमान आमदारांना जोरदार टक्कर देतील, अशी हवा मतदारसंघात झाली आहे. माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील यांना मानणारे राष्ट्रवादीतील स्वाभिमानी विचारमंचचे काही नेतेही भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे महेश शिंदे यांचे बळ वाढले आहे; पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला उमेदवार कोण, हा प्रश्न आहे. तसे झाल्यास महेश शिंदे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले तर आश्चर्य वाटायला नको. दुसरीकडे पंचायत समिती निवडणुकीत युवासेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले आपले कनिष्ठ बंधू मालोजी भोसले यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणून चत्मकार घडवला.
अशाच चत्मकाराची आशा ते येत्या विधानसभेला करत आहेत. पंचायत समिती निवडणुकीतील विजयानंतर रणजित भोसले हे विधानसभेच्या तयारीला लागले; परंतु लोकसभा निवडणुकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोरेगावमधील सभेच्या ढिसाळ नियोजनाचे खापर त्यांच्या डोक्यावर फुटल्याने ते काहीसे बॅकफूटवर गेले आहेत. महायुतीची सत्ता येणार असल्याची खात्री असल्याने भाजप-शिवसेनेत “इनकमिंग’ वाढले आहे. यात कोरेगाव तालुक्यात किशोर बाचल यांचे नाव येते. तेही शिवसेनेकडून इच्छुक आहेत. एक मात्र निश्चित की, एकास एक लढत झाल्यास विद्यमान आमदारांपुढील अडचणी वाढणार आहेत.