महेश शेडगे
कोरेगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कोरेगाव पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने विद्यमान सभापती राजाभाऊ जगदाळे यांनाच पुन्हा संधी मिळणार की, राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचा प्रयोग तालुक्यातही होऊन शिवसेनेच्या मालोजी भोसले यांना संधी मिळणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पहिली अडीच वर्षे राजाभाऊ जगदाळे (कुमठे गण) सभापती होते. ते शशिकांत शिंदे यांचे निष्ठावान कार्यकर्ते असून विधानसभा निवडणुकीत त्यांनी आणि त्यांच्या कुमठे गावाने शिंदे यांना मोठे मताधिक्य दिले होते. याची जाणीव ठेवून राष्ट्रवादीकडून पुन्हा जगदाळे यांनाच सभापतिपदाची संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघातील असलेल्या पिंपोडे बुद्रुक गणाचे सदस्य व विद्यमान उपसभापती संजय साळुंखे हेदेखील सभापतिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. रामराजे नाईक निंबाळकर आणि आ. दीपक चव्हाण यांच्याकडून त्यांचे नाव पुढे येऊ शकते. मालोजी भोसले यांचे नाव नितीन बानुगडे-पाटील यांच्याकडून पुढे येऊ शकते. दक्षिण कोरेगावातून आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून तारगाव येथील अण्णासाहेब निकम यांचे नाव पुढे येऊ शकते. शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक श्रीमंत झांजुर्णे यांच्या पत्नी सौ. शीला आणि डॉ. नितीन सावंत यांच्या पत्नी सौ. सुप्रिया यांच्या नावांचाही आग्रह होऊ शकतो.