प्रशांत जाधव
तक्रार दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ; हेलपाटे मारून तक्रारदार बेजार
सातारा – कार तारण ठेवून कर्ज देतो, असे सांगून साताऱ्यातील एका व्यावसायिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. विशेष म्हणजे संबंधित फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी वसुलीसाठी तगादा लावल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने एका महिन्यांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती; परंतु शहर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करुन न घेतल्याने “ज्याचा माल तो बेहाल अन् भामटे खुशाल’ अशी अवस्था झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देऊर (ता. कोरेगाव) येथील महेंद्र भोईटे यांचे साताऱ्यातील वाढे फाटा परिसरात ऑटो स्कॅन कार हेल्पलाइन नावाचा कार दुरुस्तीचा व्यवसाय आहे. व्यवसाय वाढीसाठी त्यांना काही पैशाची गरज असल्याने त्यांनी त्यांच्या मालकीच्या इर्टिगा कारवर कर्ज मिळवण्यासाठी महावीर फायनान्स या खासगी कंपनीकडे चौकशी केली होती. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी भोईटे यांना संपर्क करून कर्ज देत असल्याबाबत कळवल्याने भोईटे पुढील करार करण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधींना भेटले.
करार केल्यानंतर त्यांनी पाच कोरे धानदेश कंपनीच्या प्रतिनिधींकडे दिले होते. त्यानंतर महावीरच्या प्रतिनिधींनी भोईटे यांच्या कारवर दुसऱ्या एका फायनान्स कंपनीचे साडेचार लाख रुपये लोन करून दिले व त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून कारच्या कागदपत्रांवर बोजा चढवण्यासाठी पत्रव्यवहार केला. दरम्यान, बोजा चढवल्यानंतर तुम्हाला धनादेश दिला जाईल असे संबंधितांनी भोईटेंना सांगितले होते. मात्र, तेव्हापासून तब्बल साडेतीन वर्षे भोईटेंना ना धनादेश मिळाला, ना कंपनीचा कोणी प्रतिनिधी त्यांच्याकडे फिरकला.
डिसेंबर महिन्यात काही लोक त्यांच्याकडे आले ते कर्जाची रक्कम न भरल्याने त्यांची इर्टिगा घेऊन जाण्यासाठी. त्यानंतर भोईटे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत घडला प्रकार पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यापुढे कथन करुन आपली कैफियत मांडली. तरीही काही उपयोग न झाल्याने त्यानी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्याकडे धाव घेतली.
पाटील यांनी भोईटेंच्या अर्जावर सात दिवसांत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, एक महिना उलटला तरी सातारा शहर पोलिसांनी “तपास करू’, यापेक्षा वेगळे काही सांगितले नाही व केलेही नसल्याचा आरोप भोईटे यांनी केला आहे. त्यामुळे भोईटे यांना न्याय देण्यात सातारा शहर पोलिसांना कोणाचा दबाव तर नाही ना? असा सवाल विचारला जात आहे.
भोईटे यांची तक्रार आमच्याकडे आल्यानंतर संबंधितांना पोलीस ठाण्यात चौकशीकामी हजर राहण्याबाबत नोटीस काढली होती. नोटीस मिळाल्यानंतर संबंधितांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर कारवाई करण्याची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
अण्णासाहेब मांजरे पोलीस निरीक्षक, सातारा शहर.