जीवनगाणे: माझा कोण?

अरुण गोखले

माणूस जन्माला आला की, तो जन्माबरोबरच अनेकांशी वेगवेगळी नाती जोडत येतो. तो कुणाचा तरी मुलगा, मुलगी, नात, नातू म्हणून जसा ओळखला जातो. तसेच त्या घरच्या अन्य लोकांशीही त्याची नाती न कळतच जोडली जातात.

घरातून त्याची पावले बाहेरच्या अंगणात पडली की, तो शेजाऱ्यांचा कोणीतरी होतो. शाळेत तर त्याला अनेक मित्रमैत्रिणी भेटतात. शाळा, कॉलेज, ऑफिस, व्यवसाय नोकरीच्या जागीही तो अनेकांशी वेगवेगळ्या नात्यांनी जोडत जातो. त्याच्या अवती भवतीच माणसांचं जग आणि त्यातील गर्दी वाढत जाते. कधी कधी तर या सभोवतीच्या गर्दीत तो स्वत:च अस्तित्वही हरवून बसतो.
असं जरी असलं तरी सुद्धा केव्हातरी एक वेळ मात्र अशी येते की, त्या भोवतालच्या भाऊ गर्दीतही त्याला मात्र आपण अगदी एकटे आहोत. आता या क्षणी माझा कुणा म्हणू मी? असा एक प्रश्‍न त्याच्या पुढे उभा राहतो.

कारण खऱ्या अर्थाने ती सभोवतीची सारीच माणसे आता त्याच्या जवळची किंवा तो त्यांच्या जवळचा राहिलेला नसतो. सारे जण त्याला एकट्याला मागे टाकून त्याच्यापासून मनाने दूर निघून गेलेले असतात. मग तो पती असेल, पत्नी असेल, ज्यांनी जीवाभावांनी ज्यांनी त्याला वाढविले ते आई-वडील असतील, पाठची भाऊ-बहीण असतील, मित्र परिवार असेल; पण हे एक सत्य आहे की, या जीवन प्रवासात कोणाचीच कोणाला शेवटपर्यंत साथ नसते. हा जीवनाचा प्रवास ज्याचा त्याचा एकट्यानेच सुरू झालेला असतो आणि त्याच्या शेवटीही एकटेपणानेच होतो. मग त्यावेळी तोच प्रश्‍न मानवी जीवनात डोकं वर काढतो की… माझा कोण?

या प्रश्‍नाचे उत्तर देताना संत सद्‌गुरू हेच सांगतात की, हीच वेळ असते त्याला ओळखण्याची? तो कोण? याचा शोध आत घ्यायचा असतो. आपल्याला मातेच्या गर्भात सांभाळणारा, जन्माला घालणारा, आणि शेवटी माझा म्हणून तुमचा स्वीकार करणारा, तो कोण?

तर तो एक भगवंतच, त्याची सोयरिक हीच खरी आहे. त्यांनी धरलेलं आधाराचं बोट तो कधीच म्हणजे अगदी जन्मोजन्मी सोडत नाही. या सगळ्या सभोवतीच्या गर्दीत त्याला शोधा. तो सापडला ना की, तुम्हाला माझा कोण? असा प्रश्‍न भेडसावणार नाही. त्याचं आतलं अस्तित्व कळलं की, तुमचा एकटेपणा दूर होईल. त्याची ओळख हेच नरजन्माचे खरे साध्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)