सांगली : राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारत जोडो यात्रा काढली होती. राहुल गांधी ज्या प्रकारची मोट बांधतायत ती महाराष्ट्रासाठी घातक आहे. भारत जोडोमध्ये दीडशे दोनशे संघटना आहेत, यापैकी 100 पैकी जास्त अराजकतावादी संघटना आहेत. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर त्या समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या संघटना आहेत हे स्पष्ट होते.
हे भारत जोडो आंदोलन नाही, तर भारत तोडो आंदोलन आहे. तसेच राहुल गांधी संविधानाच्या नावाने लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा देत आहात, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सांगली जिल्ह्यातील जतमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते. जतमधील भाजप उमेदवार गोपीचंद पडाळकर यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, तुम्ही संविधनाच्या नावाने लाल पुस्तक का दाखताय? लाल पुस्तकच तुमच्या हातामध्ये का आहे? कुणाला तुम्ही लाल पुस्तकाच्या माध्यमातून इशारा देत आहात. आपल्या समाजाची वीण उद्धवस्त करण्याचे षडयंत्र राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्ष करतोय, असा आरोप त्यांनी केला.
आमची लढाई दुष्काळाची आहे. महाराष्ट्रात वर्षानुवर्ष दुष्काळाचे राजकारण करणारे लोक आपण पाहिले. जतमध्ये पाणी पोहचले तर माझ्या कारखान्याला पाणी पोहचणार नाही, असे काँग्रेसचे नेते म्हणाले होते. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील काही भाग जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवण्यात आला. मुठभर प्रस्थापितांनी या भागाचा दुष्काळ दूर करण्यासाठीच कधीच प्रयत्न केला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.