नवी दिल्ली – इंधनाचे दर प्रदीर्घकाळ उच्च पातळीवर असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर सर्व उत्पादने महाग होऊ लागली आहेत. नोव्हेंबर महिन्यातील घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर तब्बल 14.23 टक्के इतका मोजला गेला आहे. हा दर 16 वर्षाच्या उच्चांकावर असून गेल्या आठ महिन्यापासून तो 10 टक्क्याच्या वर असल्यामुळे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेला महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईचा दर 12.24 टक्के होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये घाऊक महागाईचा दर केवळ 2.29 टक्के इतका होता. या आकडेवारीबाबत उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, जागतिक पातळीवर सध्या महागाई वाढली आहे. पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, रसायने आणि अन्नपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाईचा दर इतक्या उच्च पातळीवर गेला आहे.
इंधन आणि ऊर्जेच्या किमती नोव्हेंबर महिन्यात 39 टक्क्यांनी वाढल्या. अन्नपदार्थांच्या किमती 7 टक्क्यांनी वाढल्या. पेट्रोलियम पदार्थाच्या किमती 91 टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे एकूण महागाईचा दर वाढला आहे. हळूहळू मॅन्यफॅक्चरिंग वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रदीर्घ काळ इंधनाच्या किमती वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून महागाई वाढल्याचे दिसत आहे. जागतिक पातळीवर इंधनाचे दर जास्त असल्यामुळे भारतात इंधनाचे दर जास्त आहेत. त्याचबरोबर विविध आयात मालाच्या किमती वाढत आहेत.
लॉक डाऊनच्या काळात भारतासह विविध देशांनी भांडवल सुलभतेच्या सवलती दिल्या होत्या. त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी, सिंगापूर या देशातील महागाईचा दर 20 टक्क्यांच्या जवळ गेला असल्याचा दावा त्या अधिकाऱ्यांनी केला. गेल्या वर्षी या काळात महागाईचा दर कमी होता. त्या तुलनेत आता महागाईचा दर जास्त भासत असल्याचा युक्तिवादही काही अधिकारी करीत आहेत.
धक्कादायक उच्च पातळी
घाऊक महागाईचा दर धक्कादायक उच्च पातळीवर असल्याचे मत ईक्रा या संस्थेच्या अर्थतज्ञ आदिती नायर यांनी व्यक्त केले. भाज्या, अंडी, प्रोटीनयुक्त पदार्थाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचे दिसून येते. ही महागाई कमी होण्यास मार्च-एप्रिल उजाडू शकेल असे मत या अगोदरच रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केले आहे.