नवी दिल्ली – ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई 6.2% या 14 महिन्याच्या उच्चांकावर गेली असतानाच घाऊक किमतीवर आधारित मागायचा दर ऑक्टोबर महिन्यात वाढून 2.36% या चार महिन्याच्या उच्चांकावर गेला आहे.
घाऊक महागाईचा दरही अन्न घटकाच्या किमती वाढल्यामुळे वाढला आहे. रिझर्व बँक व्याजदर ठरवितांना घाऊक किमतीवर आधारित महागाई विचारात घेत नाही. तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई विचारात घेते. किरकोळ किमतीवर आधारित महागाई काही महिने चार टक्क्याच्या आत राहिल्यानंतर रिझर्व बँकेकडून व्याजदर कपात अपेक्षित असते. मात्र या महागाईचा दर 6.2% वर गेला आहे. त्यामुळे डिसेंबर मध्येच नाही तर फेब्रुवारीमध्येही व्याजदर कपात होणार नाही असे समजले जात आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये घाऊक महागाईचा दर 1.84% होता. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये घाऊक महागाईचा दर उणे 0.26% होता. भाजीपाल्याच्या किमती वाढल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर वाढला आहे.
या महिन्यात भाजीपाल्याचा दर 63 टक्क्यांनी वाढला आहे. तरी एकूण अन्न घटकांचा दर या महिन्यात 11.53 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला अन्न घटकांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र काही अन्न घटकाची आयात महागात पडत आहे. तर अयोग्य पर्जन्यमानामुळे काही अन्न घटकांच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम होत असल्यामुळे ही महागाई वाढत आहे.