नवी दिल्ली – डिसेंबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाई चार महिन्याच्या निचांकावर जाऊन 5.22% इतके नोंदली गेली. असे असताना डिसेंबर महिन्यातील घाऊक किमतीवर आधारित महागाई मात्र वाढून 2.37 टक्क्यावर गेली आहे. या गुंतागुंतीच्या आकडेवारीच्या आधारावर रिझर्व बँकेला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपले पतधोरण तयार करावे लागणार आहे.
अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी झाली होती. अन्नधान्याच्या किमती कमी असल्यामुळे घाऊक किमतीवर आधारित महागाईवर याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील वस्तूच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाई वाढली असल्याचे केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.
नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक 1.89% होता. तर डिसेंबर 2023 मध्ये हा निर्देशांक 0.86% होता. म्हणजे वार्षिक आणि मासिक पातळीवर घाऊक महागाई निर्देशांकात वाढ झाली आहे. रिझर्व बँक व्याजदर ठरवितांना किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा विचार करते. परंतु ती महागाई 5% पेक्षा जास्त आहे. रिझर्व बँकेने महागाई 4% च्या आत असल्यास व्याजदर कपात शक्य असल्याचे अनेक वेळा सुचित केले आहे.
अन्नधान्याचा घाऊक महागाई निर्देशांक कमी होऊन 8.47% नोंदला गेला आहे. जो की नोव्हेंबर महिन्यात 8.63% होता. धान्य, डाळी आणि गव्हाच्या किमती डिसेंबर मध्ये कमी झाल्या. भाजीपाल्याचा महागाई निर्देशांक 28 टक्क्यावर आहे. बटाटे आणि कांद्याच्या किमती जास्त असल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे.