पणजी – गोव्यात बाजी मारणारा पक्ष दिल्लीही जिंकतो, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी गुरूवारी म्हटले. त्यातून त्यांनी गोवा विधानसभा निवडणुकीपाठोपाठ लोकसभा निवडणुकही कॉंग्रेस जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने चिदंबरम यांना प्रभारी बनवले आहे. त्यांच्या हस्ते पक्षाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना चिदंबरम यांनी गोवा निवडणुकीतील विजयाचे महत्व अधोरेखित केले. कॉंग्रेसने 2007 मध्ये गोव्यात विजय मिळवला. त्यानंतर 2009 मधील लोकसभा निवडणुकीत पक्षाने बाजी मारली. गोव्यात 2012 मध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला. त्याची पुनरावृत्ती 2014 मधील लोकसभा निवडणुकीत झाली.
त्यानंतर 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गोवा जिंकले. मात्र, पक्षाच्या आमदारांनी गोवा गमावले. पक्षाला 2019 मधील लोकसभा निवडणुकीत पुन्हा अपयश आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गोव्यात 2017 मधील निवडणुकीत कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, भाजपने वेगाने हालचाली करत लहान पक्षांशी आणि अपक्षांशी आघाडी करून सरकार स्थापन केले.