नगरसेवकांमध्ये चुरस : 19 मार्चला अर्ज दाखल केले जाणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी राजीनामा दिल्याने उपमहापौर पद रिक्त आहे. निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिल्याने पद मिळविण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस आहे. तर दुसरीकडे चार वर्षांमध्ये एकही पद न मिळाल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. आता शेवटच्या क्षणी तरी उपमहापौर पद मिळावे यासाठी इच्छुक नगरसेवकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे उपमहापौर पदाची “लॉटरी’ कोणाला लागणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी 5 मार्चला आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात त्याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र त्यांना पद देण्यापूर्वीच त्यांचा राजीनामा लिहून घेतला असल्याचे अनेक पदाधिकारी खासगीत सांगतात. त्यांना केवळ साडेचार महिन्यांच्या कालावधी भेटला. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीची नाराजी पसरली. याच नाराजीचे रुपांतर आंदोलनात होण्याची वेळ आली होती. मात्र वरिष्ठांनी समजवल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची धग कमी झाली. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. ही निवडणूक 23 मार्च रोजी आहे. तर 19 मार्च या दिवशी 3 ते 5 या वेळेत उपमहापौर पदासाठी अर्ज करायचे आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 2017 मध्ये भाजपची सत्ता आली. पहिल्या वर्षी प्राधिकरण येथील शैलजा मोरे यांना उपमहापौर करण्यात आले. त्यानंतर चिंचवडमधील सचिन चिंचवडे, मोरवाडी येथील तुषार हिंगे व चौथ्या क्रमांकाला केशव घोळवे यांना संधी देण्यात आली. आता निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष राहिल्याने हे पद मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. चार वर्षांमध्ये पद न मिळाल्याने नाराज झालेल्यांची संख्या अधिक आहे. स्थायी समितीच्या सभापती पदावरूनही भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे.
चिंचवडमधील शत्रुघ्न काटे, सुरेश भोईर व भोसरीतील रवी लांडगे यांना स्थायीच्या सभापतीपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना पक्षाने डावलल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे. याच नाराजीतून भोसरीतील रवी लांडगे यांनी स्थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यातून भाजपमध्ये असलेला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. उपमहापौर पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून भोसरीतील वसंत बोराटे इच्छुक आहेत. मागील वेळेसही त्यांना या पदापासून डावलण्यात आले होते. त्यामुळे आता ते ही उपमहापौर पदासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नाराज नगरसेवकांनाही या पदाची अपेक्षा आहे. स्थायीचे सभापतीपद भोसरीला दिल्याने आता उपमहापौर पद चिंचवडकडे द्यावे, अशी गळ येथील नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे घातली आहे.
नाराज रवी लांडगेची महापौर समजूत काढणार
स्थायीचे सभापतीपद डावलल्याने नाराज झालेल्या रवी लांडगे यांनी स्थायीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. महापौर माई ढोरे यांनी अद्याप तो राजीनामा मंजूर केला नाही. मात्र रवी लांडगे राजीनाम्यावर ठाम असल्याचे सभापतिपदाच्या निवडणुकीवेळी त्यांच्या गैरहजेरीतून दिसून आले. याबाबत महापौर माई ढोरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, रवी लांडगे हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. ते तरूण आहेत. तरूणांमध्ये लवकर राग येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात राजीनामा दिला आहे. तो मी अद्याप मंजूर केला नाही. त्यांना मी स्वतः भेटून समजूत घालणार आहे.