ऑनलाइन सोडत दि.24 रोजी : पालिकेच्या संकेतस्थळावर लाइव्ह प्रसारण
पुणे – महापालिकेमार्फत होणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 5 प्रकल्पांसाठीच्या घरकुलांची सोडत ऑनलाइन पद्धतीने दि.24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ही सोडत होणार असून, सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याविषयी माहिती दिली. या योजनेंतर्गत खराडी, हडपसर आणि वडगाव येथील 5 प्रकल्पाअंतर्गत एकूण 2 हजार 918 घरकुलांचे बांधकाम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. सदर प्रकल्पांच्या सर्व प्रकल्प अहवालांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. यात हडपसरमध्ये तीन ठिकाणी प्रकल्प असून, तेथे अनुक्रमे 340, 584 आणि 100, खराडी-786, वडगाव खुर्द येते 1,108 घरांसाठी प्रकल्प होणार आहे.
या प्रकल्पांसाठी जानेवारी 2017 ते ऑगस्ट 2017 या कालावधीमध्ये ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. त्यातील 20 हजार अर्ज वैध ठरले. त्यांचा छाननी अहवाल आणि यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
करोना आणि जमावबंदी नियमांमुळे ही सोडत https://pmc.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पाहता येणार आहे.