नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपाठोपाठ हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. आता त्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत. त्यामुळे हरियाणा आणि जम्मू-काश्मीरात कोण बाजी मारणार याचे उत्तर मिळणार आहे. आगामी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांवर परिणाम करण्याची शक्यता असल्याने त्या निकालांविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
हरियाणात मागील १० वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्या पक्षाने सत्तेची हॅट्ट्रिक करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. तर, भाजपचा प्रमुख आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेसने दशकभरानंतर सत्ता मिळवण्याच्या उद्देशातून अतिशय शर्थीने निवडणूक लढवली. त्या दोन्ही पक्षांतच प्रामुख्याने अटीतटीची लढत होणार असल्याचे मानले जाते.
अर्थात, इतर पक्षांमुळे हरियाणातील निवडणुकीचे स्वरूप बहुरंगी बनले. त्या पक्षांपैकी सर्वांधिक लक्ष आपच्या कामगिरीकडे असेल. त्याशिवाय, जननायक जनता पार्टी (जेजेपी) आणि भारतीय राष्ट्रीय लोक दल (आयएनएलडी) या त्या राज्यात प्रभाव असणारे प्रादेशिक पक्ष किती जागा जिंकणार याविषयीही कुतूहल आहे. हरियाणात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्या जागांवर एकूण १ हजार ३१ उमेदवार नशीब आजमावत आहेत.
केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू-काश्मीरला प्रथमच लोकनियुक्त सरकार लाभणार आहे. त्यामुळे तेथील विधानसभा निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. जम्मू-काश्मीरातही विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्यासाठी ८७३ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. सत्ता मिळवण्यासाठी प्रामुख्याने भाजप विरूद्ध नॅशनल कॉन्फरन्स-कॉंग्रेस आघाडी असा मुकाबला रंगल्याचे मानले जाते.
अर्थात, पीडीपी, अवामी इत्तेहाद पक्ष कशी कामगिरी करणार याकडेही लक्ष लागले आहे. केंद्र सरकारने ५ वर्षांपूर्वी राज्यघटनेचे कलम ३७० हटवले. त्यामुळे विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल झालेल्या जम्मू-काश्मीरचे रूपांतर केंद्रशासित प्रदेशात झाले. त्या निर्णयांविषयी जनमताचे आकलन होण्याचे माध्यम म्हणून यावेळच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.