नऊ उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार?

सुरेश डुबल
कराड दक्षिणेतील स्थिती; दहावा उमेदवार गेला भाजपकडे

कराड – कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आ. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल भोसले व उदय पाटील या तिघांमध्ये प्रमुख लढत होत आहे. मात्र या मतदारसंघात तब्बल नऊ उमेदवारांनी निवडणुकीत शड्डू ठोकला आहे.

यातील तीन उमेदवार हे पक्षाचे चिन्हावर उभे आहेत. तर सहा उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. यातील दहावे उमेदवार बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज राखूनही भाजपच्या उमेदवारास जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे हे नऊ उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार आणि कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता लागली आहे.

कराड दक्षिणमध्ये मोठी लढत होत असल्याने राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. या निवडणुकीत मागील निवडणुकी सारखीच स्थिती निर्माण झाली असून, येथे बहुरंगी लढत होत आहेत. मात्र खरी लढत ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी नामदार डॉ. अतुल भोसले व माजी सहकार मंत्री विलासराव उंडाळकर यांचे पुत्र उदय पाटील या तिघांमध्ये होत आहे. लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळेच येथे बाळकृष्ण देसाई हे वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहेत.

अल्ताफ शिकलगार एमआयएम, आनंद थोरवडे हे बहुजन समाजपार्टीचे उमेदवार आहेत. तर अमोल साठे, आनंदराव लादे, सदाशिव रसाळ, लतिफा मुजावर, विश्‍वजित पाटील, वैष्णवी भोसले हे सहा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या नऊ उमेदवारांनी प्रमुख तिघांना शह देण्यासाठी आपली उमेदवारी दाखल केल्याचे ते सांगत आहेत. तर बळीराजाचे पंजाबराव पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र अन्य नऊ जण ही निवडणूक लढवत आहेत.
लोकसभेला राज्यात वंचित व एमआयएम आघाडी झाली. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले.

वंचित फॅक्‍टरचा फायदा थेट भाजपलाच झाला. विधानसभेच्या निवडणुकीतही वंचित फॅक्‍टर भाजपच्या पथ्यावर पडणार, असे असतानाच प्रकाश आंबेडकर व असुद्दिन ओवेसी यांच्यात मतभेद वाढल्याने अखेर वंचित आघाडीत फूट पडली. याचा परिणाम कराड दक्षिणेवरही झाला. त्यामुळे बाळकृष्ण देसाई हे वंचितमधून स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. तर अल्ताफ शिकलगार हे एमआयएमचे उमेदवार आहेत. या दोन उमेदवारांना किती मते पडणार? हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. कारण वंचित व एमआयएम हे मतदार हे कॉंग्रेसचे पारंपरिक वोटबॅंक असल्याचे समोर आले होते.

आता मात्र यांच्यामध्ये फूट पडल्याने या वंचित, व एमआयएमचे दोन उमेदवार उभे आहेत. यांच्या मतांचा तोटा कोणत्या प्रमुख उमेदवारावर होणार, हे समजायला मार्ग नाही. एमआयएम व वंचित ही भाजपची बी टीम असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी वेळोवेळी लोकांसमोर आणले असून कराडच्या नगरपालिकेच्या निकालामुळे लोकांनाही समजले असल्याचे आघाडीचे नेते सांगत आहेत. प्रमुख तीन उमेदवार सोडून या मतदारसंघात नऊ उमेदवारांनी निवडणुकीत दंड थोपटले आहेत.

यातील कोणत्याच अपक्ष उमेदवाराने या मतदारसंघांत कामे न केलेले नाही किंवा तसा त्यांचा वावरही नाही. त्यामुळे या अपेक्षांचा फारसा फायदा किंवा तोटा कोणत्याही प्रमुख उमेदवाराला होणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. असे असले तरी हे उमेदवार नक्की कोणत्या कारणास्तव उभे राहिले आहेत अथवा या उमेदवारांना कोणी उभे केले आहे की काय? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकंदरीत मोठ्या प्रमाणात असलेल्या या अपक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांची निवडणुकीतील एन्ट्रीमुळे कोणत्या राजकीय नेत्याचे गणित बिघडेल? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.