पुरंदरमध्ये आमदारकीचा खवा कोणाला मिळणार?

चौघांच्या वादात पाचवाच मारणार ताव?

– राहुल शिंदे

नीरा – आपल्याकडे लहान मुलांना दोन बोक्‍यांची आणि माकडाची खावा वाटपाची कथा नेहमी सांगितले जाते. यातून काय बोध घ्यायचा हे पण सांगितले जाते. मात्र, पुरंदरच्या राजकारणात कोणीही याबाबत बोध घेतल्याचे दिसून येत नाही. एकत्र राहायचं आणि ऐनवेळी माझं माझं म्हणून पळत सुटायचं ही परिस्थिती आजही कायम राहिली आहे. यावर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहता सध्या आमदारकीसाठी अशीच काहीशी परिस्थिती पुरंदरमध्ये घडताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी आमदारकीची वरमाला या दोन प्रमुख शिवतारे व जगताप या प्रमुख विरोधकांपैकी कोणाला मिळते? की तिसराच कोणीतरी त्याचा फायदा उठवतो याबाबत लोकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पुरंदरमध्ये सध्या शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत. गेल्या दहा वर्षांत विकासाची काही कामे करण्यात यशस्वी झाले असले, तरी जनतेला सुरुवातीपासून जी आश्वासने दिली होती ती आश्वासने पूर्ण करण्यात त्यांना फारसे यश आले नाही. दुष्काळात जन्मलो पण दुष्काळात मरणार नाही हे त्यांचे घोषवाक्‍य होते. पण दुष्काळात जन्मलो, पण दुष्काळ हटवता येत नाही असेच म्हण्याची वेळ आली आहे. गेल्या दहा वर्षांत केवळ गुंजवणीचे थेंबभर पाणी आणण्यात सुद्धा त्यांना यश आले नाही. बारामतीप्रमाणे विकास करायचे तर सोडाच. शिवतारे यांनी दहा वर्षांत साधी एक शिक्षण संस्था किंवा एखादे विद्यालय सुद्धा सुरू केले नाही. केवळ पवार कुटुंबाच्या विरोधात राळ उठवून त्यांनी आमदारकी पदरात पाडून घेतली.

सध्या भाजप-शिवसेना सरकारच्या जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री आहेत. मात्र, तरीही पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर त्यांना पुरंदरमध्ये पाणी आणता आले नाही. विकासकामांमध्ये सुद्धा त्यांना फारसे काही करता आले नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत भाजपने पुरंदर तालुक्‍यात हळूहळू पाय पसरले आहेत. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून तालुक्‍यात रस्त्यांची तसेच वैयक्तिक लाभाची अनेक कामे पक्ष कार्यकर्त्यांनी करून माणसाला माणूस जोडण्याचे काम केले. त्यामुळे भाजपची ताकद आता तालुक्‍यात वाढली आहे. आपल्या वाढलेल्या ताकतीमुळे भाजपलाही आता पुरंदरचा आमदार आपलाच असावा असे स्वप्न दिसू लागले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत पुरंदरमधील सत्तेत असलेल्या या दोन मांजरांची आमदारकीसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. मतदारसंघात ज्याचा विद्यमान आमदार असेल ती जागा त्याच पक्षाकडे असा युतीचा पायंडा तरी भाजपने या जागेवर आपला दावा ठोकून शिवसेना पुढे आव्हान निर्माण केले आहे.

तर इकडे पवारांनी संजय जगताप यांना शब्द दिला असल्याचे म्हणत जगताप हे आपणच उमेदवार असल्याचे सांगत गावोगावी दौरे करीत आहेत. लोकांशी जनसंपर्क वाढवीत आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांत सत्ता नसली तरी देखील जनतेशी चांगला जनसंपर्क साधून ठेवला आहे. त्याचबरोबर पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील आपले संख्या बळ पुढे वाढवण्यात तसेच सासवड, जेजुरी नगरपालिका ही ताब्यात घेण्यात त्यांना यश मिळाले आहे. राष्ट्रवादीची या पाच वर्षांत तालुक्‍यात पीछेहाट झाली. मात्र, तरीही राष्ट्रवादीने संजय जगताप यांच्या विरोधात दंड थोपटण्याचा पवित्रा घेतला आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी संजय जगताप यांना पुरंदरची जागा सोडल्याचे म्हटले जात असले तरी पुरंदरमधील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मात्र असा कोणताही शब्द कोणाला कोणी दिला नसल्याचे म्हणत जागावाटप झाल्याचे ते मान्य करीत नाहीत.

यासंदर्भात त्यांनी काही वृत्तपत्रे व इलेक्‍ट्रॉनिक मीडियाला मुलाखती देऊन पुरंदरच्या जागेवर आपला दावा दाखल केला आहे. पुरंदरमधून राष्ट्रवादीतून सर्वात जास्त इच्छुक असलेले संभाजी झेंडे गावोगावी फिरून किंवा विविध तरुण मंडळ, शाळा यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करून जनसंपर्क वाढवित आहेत. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या दोन बोक्‍यामध्ये एकत्र असले तरी फुसफुस वाढल्याचे दिसते. त्यामुळे भविष्यात या दोन्ही मित्रपक्षांमध्ये पुरंदरच्या आमदारकीसाठी मोठी स्पर्धा असणार आहे. मात्र, या मित्र पक्षातील वादाचा फायदा घेण्यासाठी तालुक्‍यात एक वेगळीच फळी निर्माण होताना दिसत आहे. ही फळी पुढील काळात डोके वर काढणार आणि याचा तोटा युती आणि आघाडीतील या कुरगुड्या करणाऱ्यांना सहन करावा लागणार हे निश्चित.

पुरंदरमध्ये भाजपमध्ये जाण्यास अणेकजण इच्छुक आहेत. अगदी विद्यमान आमदार विजय शिवतारे यांचा ओढाही भाजपकडे असल्याचे पहायला मिळतो आहे. शिवतारे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक सर्वांना माहीत आहे. तर मुख्यमंत्री संजय जगताप यांना भाजपमध्ये घेण्यासाठी इच्छुक आहेत. तसे त्यांनी दोन वेळा सासवडला अनौपचारिक भेट दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर जनआशिर्वाद घेण्यासाठी निघालेले मुख्यमंत्री पुरंदरमध्ये आवर्जून येणार असल्याने त्यांच्या गळाला नक्की कोण लागतय? या बाबतही मोठी उत्सुकता लागलेली पहायला मिळते आहे.तालुक्‍यात संजय जगताप फिरत असले तरी आपल्या पक्षाचा उल्लेख फारसा न करता ते लोकांसमोर जात आहेत. त्यामुळे पुरंदरमध्ये इंदापूरची स्थिती निर्माण होवू शकते, असा अंदाज जाणकारांकडून केला जातोय. भाजप-सेना युती तुटली तर पुरंदरमधील समीकरणे वेगळी दिसल्याशिवाय राहणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.