नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही बाजूंना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले गेले आहे, ज्यात पक्षाच्या विधिमंडळ आणि संघटनात्मक शाखांचे समर्थन पत्र आणि प्रतिस्पर्धी गटांच्या लेखी निवेदनांचा समावेश करण्यास सांगण्यात आले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला, शिवसेनेच्या शिंदे गटाने आयोगाला पत्र लिहून त्यांना लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेत मिळालेल्या पाठिंब्याचा हवाला देत त्यांनी पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगितला आहे.
शिंदे यांनी 30 जून रोजी भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या मंगळवारी, लोकसभेतील शिवसेनेच्या 18 पैकी किमान 12 सदस्यांनी सभागृह नेते विनायक राऊत यांच्यावर अविश्वास व्यक्त केला आणि राहुल शेवाळे यांना पक्षनेते म्हणून घोषित केले. त्याच दिवशी लोकसभा अध्यक्षांनी शेवाळे यांना शिवसेना गटनेते म्हणून मान्यता दिली.
तत्पूर्वी, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरील दाव्यांबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपले मत ऐकून घेण्याची विनंती केली होती.