पाटणकरांचे लीड नक्की कोणाला मिळणार?

पाटण विधानसभा मतदार संघात रंगली चर्चा

पाटण – सातारा लोकसभा मतदार संघातील पाटण विधानसभा मतदार संघात यावर्षी वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र स्थानिक उमेदवार आसणाऱ्या माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी खासदार उदयनराजे यांच्यासमोर कडवे आव्हान लोकसभा निवडणुकीत उभे केल्याने पाटणकरांचे लीड कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सातारा लोकसभेची निवडणूक यावेळी रंगतदार झाली आहे. माथाडी कामगारांचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून लोकसभेचे तिकीट मिळविले. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमोर या निवडणुकीत त्यांनी कडवे आव्हान उभे केले. स्थानिक भूमिपुत्र आसणाऱ्या नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांनी खाद्यांवर घेवून पाटण विधानसभा मतदार संघ पिंजून काढला. विशेषकरून ढेबेवाडी-कुंभारगाव या घरच्या बाल्लेकिल्यात विशेष लक्ष घालून त्याठिकाणी मोठे मताधिक्‍क्‍य उमेदवार नरेंद्र पाटील यांना मिळवून देण्यात त्या यशस्वी होणार हे निश्‍चितच मानले जात आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनीही पाटण विधानसभा मतदार संघातील संपूर्ण गावे वाडया-वस्त्यांवर जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी प्रचार केला त्याचा फायदा खासदार उदयनराजे भोसले यांना निश्‍चित होणार असून संभाव्य मताधिक्‍य देण्यात राष्ट्रवादीला यश मिळणार का? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी पाटण विधानसभा मतदार संघात असणारी नाराजी पाटण तालुक्‍यातील बंद आसणाऱ्या लघु व मध्यम प्रकल्पांची कामे तालुक्‍यासाठी खर्च करण्यात आलेला खासदार निधी व मतदारांशी नसलेला संपर्क यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदार संघातून मिळणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीत गतवर्षापेक्षा यावर्षी घट होणार आहे, असे बोलले जात आहे. मात्र पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, कॉंग्रेसचे हिंदुराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील या नेते मंडळींनी पक्षाचा आदेश मानून खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचे दिसून आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.