राजगुरूनगर, {रामचंद्र सोनवणे} – खेड तालुक्यात म्हणजे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात सांस्कृतिक कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी भर दिला असून गणपती बापा कोणाला पावणार हे निवडणुकीनंतर समोर येईल सांस्कृतिक कार्यक्रम मात्र जोरात सुरु आहेत.
खेड तालुक्यात आर्थिक सुबत्ता आहे.आर्थिकदृष्ट्या खेड तालुक्यातील राजकीय नेते आर्थिक सक्षम आहेत. त्यामुळे राजकारणही त्याच प्रमाणात सुरू आहे. राजकारणात साम, दाम, मसल पॉवरचा नेहमीच वापर होत आला आहे.
हे सर्वस्वी नागरिक अनुभवत आले आहेत. अगदी ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी,पंचायत समिती, जिल्हा परिषद. नगरपरिषद आणि विधानसभा निवडणुकीत साम, दाम, मसल पॉवरचा नेहमीच वापर झाला आहे. यामुळे खेड-आळंदी विधानसभेतील अनेक गावांमधील निवडणूक नेहमीच गाजत आहेत गाजल्या आहेत.
सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली राबविली तिचा आधार घेत अनेक इच्छुक उमेदवारांनी ही योजना मतदारांपर्यंत राबवली.
सरकार मतदारांना आमिष दाखवते मग इच्छुक उमेदवार कसे मागे राहतील. या योजनेचा आधार घेत महिलांना साड्या वाटप, आकर्षक वस्तू वाटप, देवदर्शन घडवले जात आहे.
यावर्षी दहीहंडी व गणेशोत्सव ऐन विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आल्याने खेड आळंदी विधान सभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी धुमधडाक्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले.
दहीहंडी उत्सवात विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे अंकुश राक्षे, शरद पवार गटाचे सुधीर मुंगसे, अतुल देशमुख, शिवसेनेचे अक्षय जाधव यांनी दहीहंडी उत्सव साजरे केले.
या दहीहंडी कार्यक्रमासाठी मराठाआरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक सेलेब्रिटीची हजेरी लावली. दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाले. यातून निवडणुकीची तयारी आणि जोश इच्छुकांनी दाखवून दिला होता.
मतदारांकडून मिळेल ते घेण्याचा प्रयत्न
खेड-आळंदी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्या दृष्टीने अनेक जण इच्छुक उमेदवार झाले आहेत. इच्छुक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
देव दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, गाव बैठक, गावभेट दौरे, पैठणीचे कार्यक्रम, साड्या आणि विविध वस्तू वाटप यांची रेलचेल सुरू आहे तर मतदारही त्यांच्या या कृतीचे स्वागत करीत असून मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
होर्डिंगबाजीला ऊत
सध्या गणपती उत्सव सुरू आहे तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे तर गणेश मंडळाचे कार्यक्रम स्थळी होर्डिंगबाजी सुरू आहे.
गणपती मंडळाच्या माध्यमातून मतदार आणि जनतेपुढे जाण्याचा इच्छुक उमेदवारांचा प्रयत्न आहे. काही इच्छुक उमेदवार ज्याच्या-त्याच्या पातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत जनतेपर्यंत संवाद साधत आहेत.
भेटी, आरत्या सुरू
खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार दिलीप मोहिते पाटील हे अजितदादा पवार गटाचे एकमेव उमेदवार आहेत. तर प्रतिस्पर्धी शरद पवार गटाकडून सुधीर मुंगसे,
अतुल देशमुख, बाबा राक्षे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अमोल पवार, बाबाजी काळे, शिंदे गटाकडून अक्षय जाधव, मराठा क्रांती मोर्चकडून अंकुश राक्षे यांची जोरदार तयारी सुरू आहे.
विधानसभा मतदारसंघातील अनेक गणपती मंडळांना या इच्छुकांच्या भेटी, आरत्या सुरू आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत गणपती बापा कोणाला पावणार हे निवडणुकीनंतरच समजणार आहे. सद्यस्थितीला मतदारांशी संपर्क साधण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून होत आहेत.