रणसंग्रमात कोण ठरणार ‘बाजीगर’?

जिल्ह्यातील दहाही मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे चेहरे स्पष्ट


आता बंडाळी कशी शांत होणार याकडे लक्ष


अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, तर सोमवारी उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार

जिल्ह्यातील दहाही मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे उमेदवार घोषित झाले आहेत. त्यात आता नाराज गट काय भूमिका घेतो? अन्‌ बंडोबांना पक्षश्रेष्ठी कशा पद्धतीने शांत करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (दि. 4) शेवटचा दिवस असून अनेक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. तर सोमवारी (दि. 7) अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख असल्याने याचदिवशी या दहा मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार असून मंगळवार (दि. 8) पासून प्रचाराची औपचारीकपणे “राळ’ उडणार आहे. तर या विधानसभा रणसंग्रामात कोण “बाजीगर’ ठरणार हे गुरुवारी (दि. 24) स्पष्ट होणार असल्याने आता 21 दिवस “कळ’ काढावी लागणार आहे.

जिल्ह्यात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर-हवेली, शिरूर-हवेली, आंबेगाव-शिरूर, खेड-आळंदी, जुन्नर, भोर, मावळ या दहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील जवळपास सर्वच मतदारसंघात मातब्बरांमध्येच यंदा काट्याची टक्‍कर होणार असून महाआघाडी-महायुती असाच समान रंगणार असून एक-दोन मतदारसंघात अपक्ष उमेदवार कडवे आव्हान उभे करू शकतात, अशी शक्‍यता राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्‍त केली आहे.

बारामती : राज्याचे लक्ष लागलेली लढत
बारामती विधानसभा मतदासंघ पवारांचा गड मानला जातो. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाआघाडीचे उमेदवार असून ते सातव्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहे. याच गडाला हादरा देण्याचा चंग यंदा महायुतीने बांधला असून त्यांनी स्थानिकांना डावलत गोपीनाथ पडळकर या उमेदवाराला संधी दिली आहे. त्यामुळे “स्थानिक’ पवारांच्या मागेच उभे राहणार की यंदा परिवर्तन घडवणार हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे.

इंदापूर : आजी-माजी आमदारांमध्ये सामना
या मतदासंघात महायुतीचे उमेदवार भाजपचे हर्षवर्धन पाटील तर महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांच्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. भरणे आणि भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यात आता 2019 मध्ये तिसऱ्यांदा सामना रंगणार आहे. 2009 च्या निवडणुकीत भरणे अपक्ष म्हणून उभे होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये त्यांनी पाटील यांचा पराभव केला. आता 2019 मध्ये काय होणार याची उत्सुकता आहे.

दौंड : दुरंगी लढत निश्‍चित मात्र…
अनिश्‍चितेच्या हिंदोळ्यातील मतरसंघ म्हणून दौंडची ओळख. येथे 2014 मध्ये आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादीचे मातब्बर उमेदवार रमेश थोरात यांना धुळ चारली होती. तर यंदा राहुल कुल भाजपच्या “कमळ’ की राष्ट्रीय समाज पक्षाच्या “कपबशी’ चिन्हावर निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर झाल्याने यंदा पुन्हा कुल-थोरात यांच्यातच लढत होणार फक्‍त “घडाळ्या’विरुद्ध “कमळ’ की “कपबशी’ चिन्ह येणार हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे.

पुरंदर-हवेली : पुन्हा शिवतारे-जगताप टक्‍कर
या मतदारसंघात हॅट्ट्रिक करण्यासाठी महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे तथा राज्यमंत्री विजय शिवतारे हे सज्ज झाले आहे. तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी महाआघाडीतील कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप हे शिवतारेंची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा शिवतारे-जगताप असाच सामना होणार असून यंदा हॅट्ट्रिक होणार की रोखली जाणार हे लक्षवेधी ठरणार आहे.

शिरूर-हवेली : पुन्हा पाचर्णे-पवार समोरासमोर
या मतदासंघात महायुतीचे उमेदवार भाजपचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे व महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांच्यात पुन्हा सामना रंगणार असल्याने आजी-माजी आमदारांमध्ये कोण सरस ठरणार? आणि या? महायुती-महाआघाडीतील इच्छुक बंडाळीद्वारे या मतदारसंघात तिरंगी लढत उभी करणार का? हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे.

आंबेगाव-शिरूर : राष्ट्रवादी-शिवसेनेत सामना
आंबेगाव-शिरूर मतदारसंघात शिरूर तालुक्‍यातील 39 गावे येत असून या गावातील मतदान कायमच महत्त्वाचे ठरले आहे. या मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे तथा माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील सातव्यांदा लढतीसाठी सज्ज झाले आहे. तर शिवसेनेने गुरुवारी (दि. 3) सकाळी राजाराम बाणखेले यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केले असल्याने यंदा परंपरेप्रमाणे “घड्याळ’-“धनुष्यबाण’ यात दुरंगी लढत होणार असून यात कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल; मात्र तोपर्यंत “वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यावी लागणार आहे.

खेड-आळंदी : घड्याळाची टिकटीक की धनुष्याबाण चालणार
या मतदारसंघात यंदाही महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे व महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील या आजी-माजी आमदारांमध्येच लढत रंगणार असली तरी भाजचे इच्छुक अतुल देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यंदा या मतदारसंघात तिरंगी लढत रंगार की देशमुख अर्ज माघारी घेणार हे पाहणे औत्स्युक्‍याचे राहील. दरम्यान, राष्ट्रवादीने बुधवारी (दि. 2) रात्री उशिरा जाहीर केलेल्या यादीत दिलीप मोहिते यांचे नाव नसल्याने मोठा “सस्पेन्स’ निर्माण झाला होता. मात्र, गुरुवारी (दि. 3) सकाळी मोहिते पाटलांचे नाव जाहीर झाले अन “सस्पेन्स’वर पडदा पडला.

जुन्नर : तिरंगी लढत रंगणार?
या मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना-अपक्ष यांच्यात लढत रंगाणार असल्याचे सध्याचे चित्र असले तरी हे चित्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवट (सोमवार दि. 7) च्या दिवसानंतरही कायम राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे शरद सोनवणे, महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे अतुल बेनके, तर अपक्ष म्हणून आशा बुचके हे तीन तगडे उमेदवार आमनेसामने ठाकले असल्याने यात कोण बाजी मारणार हे दिवाळी आधी समजेलच मात्र, तोपर्यंत कळ काढावी लागणार आहे.

भोर : महायुतीत बंडाळीचे ग्रहण
या मतदारसंघात भोर-वेल्हे-मुळशी या तालुक्‍यांचा समावेश होतो. त्यामुळे या मतदासंघात हॅट्ट्रिक करण्यासाठी महाआघाडीचे उमेदवार कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे तर त्यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी परंपरेप्रमाणे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे कुलदिप कोंडे सज्ज झाले आहे. दरम्यान, महायुतीत आतातरी “बंडाळी’ झाली असली तरी सोमवारी (दि. 7) अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे बंडाळीचे “ग्रहण’ सुटणार की तिरंगी लढत रंगणार? की यंदा हॅट्ट्रिक होणार की हुकणार हे येणारा काळच स्पष्ट करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.