प्रचाराला उरले अवघे पाच दिवस : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी कार्यक्षेत्रातील
वातावरण तापले
बारामती (प्रतिनिधी) – साखर उताराप्रमाणे राज्यात उच्चांकी दर देणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या नीळकंठेश्वर पॅनल तसेच चंद्रराव तावरे गटाच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्ये ही लढत रंगत आहे. सत्ताधारी चंद्रराव तावरे गट की अजित पवार गट बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधी गटाकडून सत्ताधारी गटावर आरोप होत आहेत, तर विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडन सत्ताधारी गट करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर धूम
सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पोस्टर, बॅनरबाजीपेक्षा सोशल मीडियाला महत्त्व दिले गेले आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपांच्या फैरी झडताहेत. दोन्ही गटाकडून सोशल मीडियाची सक्षम यंत्रणा कार्यान्वित आहे. घोंगडी बैठका पदयात्रा तसेच भाषणबाजीचे थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे.
प्रतिष्ठापणाला
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा कारखाना म्हणून माळेगाव कारखान्याकडे पाहिले जाते मात्र, चंद्रराव तावरे गटाने 1997 व 2014 च्या निवडणुकीत सत्तांतर घडवत कारखान्यावर वर्चस्व निर्माण केले. पराभवाची सल मनात असल्याचे अजित पवार यांनी जाहीर भाषणात बोलून दाखविले. त्यामुळे कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर राज्यात उच्चांकी भाव देणारा कारखाना तिसऱ्यांदा आपल्याच ताब्यात रहावा यासाठी चंद्रराव तावरे गटाने व्यूहरचना आखली आहे.
आरोप-प्रत्यारोप
माळेगाव कारखान्याचे विस्तारीकरण कशासाठी तसेच माळेगावचा साखर उतारा सोमेश्वरपेक्षा कमी कसा अशा प्रकारचे आरोप विरोधी गटाकडून होत आहेत तर विक्रमी वेळेत विस्तार वाढ करून सभासदांना उच्चांकी दर देण्यात आला आहे. सोमेश्वरचा साखर उतारा माळेगावपेक्षा अधिक आहे तर सभासदांना माळेगावपेक्षा जास्तीचा दर का दिला जात नाही असे सांगत सत्ताधारी गट विरोधकांच्या आरोपांचे खंडन करताना दिसत आहे.
उच्चांकी दराचा गजर
सोमेश्वर तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात माळेगावच्या उच्चांकी दराचा गजर सध्या सुरू आहे. छत्रपती व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यापेक्षा माळेगावचा दर अधिक आहे अशी सभासदांच्या भावना आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याची निवडणूक असली तरीदेखील छत्रपती व सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसदराचा गजर सुरू आहे.
क्रॉस वोटिंग
माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील पाच गटात होत असलेल्या निवडणुकीचे चित्र पाहता “क्रॉस वोटिंग’चा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे निरावागज, पणदरे गटासह इतर काही गटात देखील “क्रॉस वोटिंग’चा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दिग्गजांचा कस लागणार आहे. तर “क्रॉस वोटिंग’चा फटका कोणाला बसणार याची चर्चा सध्या पारावर सुरू आहे.