बारामतीत मतदारांचा कौल कुणाला?

पुणे – पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघांपैकी आज (दि.23) बारामती आणि पुणे मतदार संघाकरिता 59.94 टक्के मतदान झाले. बारामती 2372 मतदान केंद्रे आणि 21 लाख 12 हजार 408 मतदार तर पुण्यात 1997 मतदान केंद्रे आणि 20 लाख 74 हजार 861 मतदार असल्याने किमान 80 ते 90 टक्के मतदान होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मतदारांचा कौल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मत पेटीत बंद झाला. दि. 23 मे पर्यंत उमेदवारांना याची वाट पहावी लागणार आहे.

जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी सर्वाधिक चुरशीची लढत बारामती मतदार संघात असल्याने या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी किती वाढते याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून होते. सकाळी 11 वाजेपर्यंत या मतदारसंघात केवळ 13 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याबाबत शंका निर्माण होऊ लागली. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वच तालुक्‍यात मतदानाची टक्केवारी काहीशी वाढली दौंडमध्ये 19.64 टक्के, इंदापुरात 20 टक्के, बारामती 23 टक्के, पुरंदर 17.50 टक्के, भोरमध्ये 12.46 टक्के आणि खडकवासलामध्ये 20.6 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाले होते. त्यानंतर सर्वच तालुक्‍यांत दुपारी 4 वाजपर्यंत मतदानाचा 40 टक्के आकडा ओलांडला होता. किमान मतदान झाल्याने बारामती मतदारसंघातील सर्वच तालुक्‍यातील शासकीय अधिकाऱ्यांसह उमेदवार आणि कार्यकर्त्यांची सुटकेचा निश्‍वास सोडला.

निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रांत सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्टही करण्यात आले. जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहत होते. मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे असल्याने बोगस मतदान रोखण्याकरिता यंत्रणेकडून विशेष काळजी घेण्यात आली. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही आयोगाकडून सांगण्यात आल्याने, मतदाचा आकडा वाढण्यास मदत झाली.

परंतु, काही ठिकाणी ग्रामीण भागात मतदान करताना आयोगाच्या ओळखपत्राची अडचण निर्माण झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते. यामुळे मतदार यादीत नाव असलेल्यांकरिता पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बॅंकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निदेर्शांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्‍स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड अशी कागदपत्रांची तपासणी करूनच मतदान करण्यास परवानगी देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.