“डब्लूएचओ’चे पथक चीनमध्ये दाखल

करोना ऍन्टीबॉडीज सापडल्याने सिंगापूरच्या तज्ञांना रोखले

बीजिंग/ वुहान – जगभर पसरलेल्या करोना विषाणूची उत्पत्ती शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे 13 संशोधकांचे पथक आज चीनच्या वुहान प्रांतात दाखल झाले. या पथकातील दोन संशोधक सिंगापूरवरून येणार होते. मात्र त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे ऐनवेळी त्यांचा प्रवास रद्द झाला. 

“डब्लूएचओ’चे 13 संशोधकांचे पथक वुहानमध्ये आज दाखल झाले असून 2 आठवड्यांच्या विलगीकरण कालावधीतच ते तातडीने आपल्या संशोधनाच्या कामाला प्रारंभ करणार आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

दोन तज्ञ अधिकाऱ्यांच्या करोना ऍन्टीबॉडीजबाबतच्या चाचण्या “पॉझिटिव्ह’ आल्यामुळे त्यांना विमान प्रवासाची परवानगी मिळू शकलेली नाही, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.

चीनने या दोन संशोधकांना चीनला येण्यापूर्वी दोन दिवस आगोदर न्युक्‍लेरिक ऍसिडची चाचणी आयजीएम ऍन्टीबॉडी चाचणी करण्याची सूचनाही केली आहे. या दोन संशोधकांना चीनमध्ये येण्याची परवानगी दिली गेली नसल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते झाओ लिजान यांनी समर्थनच केले आहे. करोनाच्या साथीमुळे लागू केलेल्या उपाय योजनांचे कठोरपणे पालन केले जाईल असे लिजान म्हणाले. 

मात्र वुहान प्रांतात आलेल्या तज्ञांच्या पथकाला चीन प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल. हे 13 सदस्यीय पथक 14 दिवस विलगीकरणामध्ये असेल. त्यानंतर ते नागरिकांच्या मुलाखती घेतील. संशोधन संस्था, रुग्णालये आणि सागरी मत्स्य बाजारालाही ते भेट देणार आहेत.

या पथकामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, रशिया, नेदरलॅन्ड, कतार आणि व्हिएतनामच्या तज्ञांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.