-->

पतंजलीच्या कोरोनिलला WHO ची चपराक ! रामदेव बाबांचा ‘तो’ दावा निघाला खोटा

नवी दिल्ली योग गुरु बाबा रामदेव यांची ‘पतंजली आयुर्वेद’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय. कोव्हीड-१९ उपचारांसाठी आपल्या कोरोनिल या औषधाला आयुष मंत्रालयाने प्रमाणित केल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरण योजनेतून पतंजलीच्या करोनावरील औषधाला प्रमाणपत्र देण्यात आलंय अशी माहिती पतंजलीने दिली होती. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व हॅन्डलवरून कोरोनिल सारख्या लसींना प्रमाणित केलं नसल्याचं म्हटले आहे. रामदेव बाबांच्या पंतजली समूहाला ही सनसनीत चपराक मानली जात आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया हॅन्डलवरून ट्विट करत म्हटलं की, डब्ल्यूएचओने उपचारासाठी कोणत्याही पारंपारिक औषधांच्या प्रभावीपणाचे प्रमाणिकरण केलेले नाही. अर्थात कोरोनिलचे देखील केले नसल्याचे स्पष्ट होतं. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणीकरण योजनेतून पतंजलीच्या करोनावरील औषधाला प्रमाणपत्र देण्यात आल्याचा पंतजलीने केलेले दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कोरोनिल लॉन्चिंगच्या काही वेळानेच WHO ने रामदेव बाबांच्या लसीसंदर्भात स्पष्टीकरण दिले होते.


केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पतंजलीने कोरोनिल औषधाला आयुष मंत्रालयाने प्रमाणित केल्याचं सांगितलं होत. मात्र यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलं असून इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच खुद्द आरोग्यमंत्रीच अशा वैज्ञानिक आधार नसलेल्या उत्पादनाला कसं काय  प्रोत्साहन देऊ शकतात? असा प्रश्नही इंडियन मेडिकल असोसिएशनने उपस्थित केलाय.

 

दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत तीव्र प्रतिक्रिया देताना, ‘आरोग्यमंत्री जे स्वतः एक डॉक्टर आहेत, त्यांच्याच उपस्थितीत सादर करण्यात आलेल्या करोनिल औषधाच्या प्रमाणीकरणाबाबत खोटा दावा करण्यात आल्याचा प्रकार गंभीर आहे. आरोग्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा द्यायला हवा.’ अशी मागणी केली. तसेच कोरोनिल खरोखर करोना विषाणूवर प्रभावी असेल तर सरकार करोना लसीकरणावर ३५ हजार करोड रुपयांचा खर्च कशासाठी करत आहे असा प्रश्नही आयएमएने उपस्थित केलाय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.