पुणे – करोना काय फक्त देवळातच आहे का? मद्यालये उघडली परंतु देवालये उघडायला सरकार घाबरते आहे. ते न उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर नक्की कोणाचा दबाव आहे, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी कसबा गणपती मंदिरात आंदोलन केले.
यावेळी बाबू वागसकर, विजय तडवलकर, प्रल्हाद गवळी, राम बोरकर, हेमंत बत्ते, सुनील कदम, राहुल गवळी उपस्थित होते.
देऊळ उघडून तेथे प्रतीकात्मक होम करत देवाला साकडे घातले. म्हणूनच मनसेने पुण्याचे ग्रामदैवत असणारे कसबा गणपती देऊळ बुधवारी उघडले. देवळात जाऊन प्रतीकात्मक होम करत देवाला नागरिकांना करोनामधून लवकर मुक्त कर आणि बेकारी, महागाई यातून जनतेची सुटका कर हे साकडे घातले. सरकारने आता भक्तांचा अंत पाहू नये, देवळे उघडावीत अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल, हा इशारा शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला.
हिंदुत्वाच्या नावावर मते मागणारी, आता शिवसेना सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवत असल्याचे दिसत आहे. तथाकथित हिंदूविरोधी विचाराचे दोन्ही कॉंग्रेसरूपी सहकारी आणि सत्तेसाठी मम म्हणणारी सेना हे आजचे चित्र आहे, अशी टीका केली.