‘त्या’ ३० हजार ९०० जणांच्या मृत्यूस कोणाला जबाबदार धरायचं?; फडणवीसांचा सरकारला तिखट सवाल

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. महाराष्ट्र सरकारला करोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवायला अपयश आल्याचे सांगत योग्य नियोजन केले असते तर राज्यामधील ३० हजार रुग्णांचे प्राण वाचू शकले असते असेही फडणवीस म्हणाले आहेत. तसेच यांच्या मृत्यूस कोणाला जबाबदार धरायचे असा तिखट सवाल देखील त्यांनी केला आहे.

“कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी केली असती तर राज्यातील ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी असते. तसेच करोनामुळे मरण पावलेल्या ३० हजार ९०० करोना रुग्णांना महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं?”, असा प्रश्न फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला. तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.

“आम्ही सगळ्यात मोठं रुग्णालय विक्रमी वेळेत बांधल्याचे सांगण्यात आले, पण यात विक्रमी भ्रष्टाचारदेखील झाला. निविदा न मागवता गाद्या, उशा, सलाइन यांवर ६० लाख रुपये खर्च केले. १२०० रुपयांचं थर्मामीटर ६५०० रुपयांत खरेदी केली. २ लाखांच्या बेडशीटसाठी ८.५ लाख भाडं दिलं. पंख्याचं ९० दिवसांचं भाडं ९ हजार दिलं. हजार प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं चार लाख रुपये. लाकडाचे १५० टेबलचं भाडं सहा लाख ७५ हजार रुपये. काय काय घोटाळे सांगायचे,” असंही फडणवीस म्हणाले. तसेच “जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळ्याची पुस्तिका तयार केली असून मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे. हा रेकॉर्ड वेळेतील भ्रष्टाचार आहे,” असा आरोप फडणवीसांनी केला. मृतदेहांच्या बॅग, पीपीई किटचाही घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केली. घोटाळा समोर आणला तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी या शब्दाचा अर्थ कळेल अशी टीका त्यांनी केली.

राज्यपालांच्या १२ पानांच्या भाषणात मला कुठेही यशोगाथा दिसत नाही, तर वेदना आणि व्यथा दिसतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी यावेळी राज्यपालांना नाकारण्यात आलेल्या विमान प्रवासावरुनही सरकारवर निशाणा साधला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरु असून, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीसांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.