मावळात स्त्री शक्‍तीचा कौल कुणाला?

प्रचारात प्रश्‍नांकडे दुर्लक्ष ः 6 लाख 22 हजार महिलांचे मतदान

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातील प्रचारात यावेळी विकास कामांऐवजी वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांवर उमेदवारांचा भर राहिला. प्रचार यंत्रणेत स्त्री शक्ती दिसत असली तरी महिला प्रश्‍नांचा अभाव प्रचाराच्या मुद्यांमध्ये दिसून आला. असे असतानाही महिलांमुळे मतदानाचा टक्का वाढला आहे. 10 लाख 94 हजार महिला मतदारांपैकी 6 लाख 22 हजार महिलांनी मतदान केले असून त्यांचा कौल कोणाला, याची चर्चा रंगली आहे.

मावळ लोकसभा मतदार संघासाठी नुकतेच मतदान पार पडले. मतदानाच्या टक्केवारीवरुन उमेदवारांची विजयासाठीची आकडेमोड सुरू झाली आहे. या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 22 लाख 97 हजार 405 आहे. त्यातील 59.49 टक्के मतदारांनी म्हणजे 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी मतदान केले आहे. मावळ मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील चिंचवड, पिंपरी आणि मावळ, तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. एकूण मतदार संख्येच्या सुमारे 45 टक्के मतदान हे महिलांचे असल्याने स्त्री शक्तीचे मतदान महत्त्वाचे होते.

यंदा महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र महिलांच्या सखी केंद्राशिवाय अशी व्यवस्था नव्हती. तरीही महिलांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. शहरी, ग्रामीण सर्वच ठिकाणच्या मतदान केंद्रांवर महिलांची गर्दी पहायला मिळाली. मावळ लोकसभा मतदारसंघात 10 लाख 94 हजार 454 महिला मतदार होत्या. त्यापैकी 6 लाख 22 हजार महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याचे श्रेय त्यांना दिले जात आहे.

मावळामधून 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामध्ये अवघ्या दोन महिला उमेदवारांचा समावेश होता. महिला मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेत महिलांचा सहभाग होता. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना नात्या-गोत्यातील महिला सदस्यांना प्रचारात उतरविले होते. मात्र, प्रचारात महिलांच्या प्रश्‍नांचा अभाव दिसून आला. येथील उमेदवारांनी घराणेशाही, वैयक्तिक टीका-टीपण्णीवर भर दिला. त्यामुळे विकास कामांचे मुद्दे बाजूलाच राहिले.

महिला सुरक्षितता, महिलांसाठी स्वयंरोजगार उपक्रम, युवतींना उच्च शिक्षणासाठी योजना, महिलांचे आर्थिक सबलीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा, विधानसभेत आरक्षण वाढ, शासकीय नोकऱ्यांमध्ये राखीव जागांमध्ये वाढ, महिला आरोग्यासाठी स्वतंत्र योजना अशा अनेक मुद्दे उमेदवारांच्या वचननाम्यातही “कोरे’च राहिले. त्यामुळे महिला मतदार कोणाच्या झोळीत मतांचे दान टाकणार, याबाबत मावळ लोकसभा मतदार संघात कमालीची उत्सुकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.