दौंड नगरपालिका उपनगराध्यक्षपदी कोण?

दौंड – नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षाची निवडणूक मंगळवारी (दि. 27) होत आहे. विद्यमान उपनगराध्यक्ष राजेश जाधव यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक होत आहे.

नगरपालिकेत नगराध्यक्षपदी नागरिक संरक्षण मंडळाच्या शीतल कटारिया आहेत. मात्र, नगरसेवकांचे बहुमत हे राष्ट्रवादी व शिवसेना युतीचे आहे. यामुळे या ठिकाणी उपनगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा होईल यात काही शंका नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात ज्याप्रमाणे पक्षांतर बदलाचे वारे वाहत आहे, त्याप्रमाणे नगरपालिकेतही वारे वाहते की काय? याकडे दौंडकरांचे लक्ष लागले आहे. नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश जाधव यांनी आपला कार्यकाल संपल्याने पदाचा राजीनामा दिला आहे. दौंड नगरपालिकेत राष्ट्रवादी-शिवसेना युतीचे 14 सदस्य असून नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडीचे 10 सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपद नागरिक हित आघाडीकडे आहे, अशा परिस्थितीत मागीलप्रमाणेच उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होते की कटारिया गट उपनगराध्यक्षपदासाठी लागणाऱ्या जादूई आकड्यासाठी प्रयत्न करतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

दौंडच्या उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून वसीम शेख यांचे नाव आघाडीवर आहे तर प्रणोती चलवादी इच्छुक आहेत. उपनगराध्यक्ष राजेश जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत उपनगराध्यक्ष निवडीचा अधिकार नगरसेवकांच्या वतीने जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व नगरपालिकेतील गटनेते बादशाह शेख यांना देण्यात आले आहेत, त्यामुळे आता दौंडचा उपनगराध्यक्षम म्हणून कोणला संधी दिली जाणार, हे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.