घोटाळेबहाद्दरांना कोण देतंय राजाश्रय ? -राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: मोदी सरकारच्या काळात बँक घोटाळे करून परदेशात पळून गेलेल्या घोटाळेबहाद्दरांची यादी चांगलीच लांबलचक आहे. या घोटाळेबहाद्दरांना कोण राजाश्रय देतंय ?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबत माहिती दिली आहे.

“मल्ल्या, नीरव मोदी, भूपेश जैन अशी अनेक नावे आहेत. पण बँक घोटाळ्यांची रक्कम ऐकलीत तर धक्काच बसेल २०१८-१९ आर्थिक वर्षात ६,८0१ प्रकरणांत तब्बल ७१,५४२.९३ कोटी रुपयांचे बँक घोटाळे झाले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकने ही माहिती अधिकृतरित्या दिली आहे. आधीच्या वर्षांच्या तुलनेत घोटाळ्यातील रक्कम तब्बल ७३ टक्क्यांनी वाढली आहे. २0१७-१८ मध्ये बँक घोटाळ्यांची संख्या ५ हजार ९१६ इतकी होती; तर घोटाळ्यातील रक्कम ४१,१६७.0३ कोटी रुपये होती”

युती सरकारच्या काळात २०१६-१७पर्यंत घोटाळेवाढीचा सरासरी दर बघितला तर वर्षाला ३०० घोटाळे वाढल्याचे निदर्शनास येते. २०१७-१८ आणि २०१८-१९ ज्या काळात जीएसटी आणि नोटाबंदी लागू झाली त्या काळात घोटाळ्यांची संख्या ९०० ने वाढली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीने घोटाळ्यांची तीव्रता वाढवली असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. आता या घोटाळेबहाद्दरांवर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)