West Bengal News | पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदाचा पुढचा चेहरा कोण असणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेस आणि भाजपसह राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर करत संकेत देण्यात आले आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार कुणाल घोष यांच्या फेसबुक पोस्टमुळे बंगालचे राजकारण चांगलेच तापले आहे. ममता बॅनर्जींनंतर अभिषेक बॅनर्जी राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, असा दावा त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कुणाल घोष यांनी त्यांना चांगले आरोग्य, विशेषत: डोळ्यांशी संबंधित समस्या बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, अभिषेक बॅनर्जी यांच्या पक्षातील योगदानाचेही कुणाल घोष यांनी कौतुक केले.
कुणाल घोष यांची फेसबुक पोस्ट
कुणाल घोष यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अभिषेक बॅनर्जी यांनी अगदी लहान वयातच आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केली आहे. मी राजकारणात सक्रीय राहो की नाही, या उगवत्या ताऱ्याला मी जवळून पाहीन. अभिषेक तरुण आहेत, पण जोपर्यंत मी टीएमसीमध्ये सक्रिय आहे, तोपर्यंत ते माझे नेते आहेत. राजकारणापलीकडेही मला त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आदर आहे. मी ममता बॅनर्जी यांना वर्षानुवर्षे नेतृत्व करताना पाहिले आहे आणि आता मी अभिषेक यांना उदयास येताना पाहत आहे.”
पुढे कुणाल घोष म्हणाले की, “अभिषेक बॅनर्जी काळानुसार अधिक परिपक्व होत आहेत, आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ करत आहेत, आपल्या कौशल्यात अधिक सुधारणा करत आहेत. अभिषेक हे एक दिवस पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होतील आणि तृणमूल काँग्रेसला एका नव्या युगात घेऊन जातील. ते ममता बॅनर्जींच्या भावना आणि वारशाचे प्रतीक आहेत.” दरम्यान, अभिषेक बॅनर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत.
दरम्यान, कुणाल घोष यांनी अभिषेक बॅनर्जी यांना ममता बॅनर्जींचा उत्तराधिकारी म्हणून पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पत्रकार परिषदेतही त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांचे ममता बॅनर्जींचे उत्तराधिकारी म्हणून वर्णन केले होते. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरुन अभिषेक बॅनर्जी चर्चेत आले आहेत.
हेही वाचा:
नताशाच्या व्हिडिओ पाहून हार्दिकचे चाहते संतापले