…तर भाजपाचे नवे अध्यक्ष कोण?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपाने यश मिळवल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना केंद्रात महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्‍यता आहे. अमित शहा यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. जे पी नड्डा आणि धर्मेंद्र प्रधान या दोघांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशभरात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे शहा यांच्यानंतर पक्षाची ही घोडदौड कायम ठेवणे, हे नवीन अध्यक्षांसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. तर अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपद स्वीकारले नाही तर अमित शहा यांना अर्थखात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.

केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची, याबाबत मोदी- शहा यांचे विशेष लक्ष आहे. रोजगारनिर्मितीवर मोदी सरकार भर देणार असल्याचे समजते. कृषी, खाण, खाद्य प्रक्रिया, उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय अशा मंत्रालयांची जबाबदारी कोणाकडे द्यायची, यावर विचारविनिमय सुरू आहे. ही खाती आजवर महत्त्वाची मानली गेली नाहीत. पण मोदी सरकारने या मंत्रालयांकडेही विशेष लक्ष दिले आहे, असे एका नेत्याने सांगितले.

लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर होताच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा सुरू झाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपाने तब्बल 303 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 चा आकडा ओलांडला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मोदी यांचे विश्‍वासू साथीदार म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांना केंद्रात महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.