माढ्याचा खासदार कोण?

नागनाथ डोंबे

म्हसवड  –देशात बहुचर्चित समजल्या गेलेल्या माढा लोकसभा मतदार संघातील निकाल काय लागेल? कोणता उमेदवार निवडून येईल? कोणत्या उमेदवाराला किती मते मिळतील? याबाबत नागरिकांतून तर्कवितर्क लावले जावू लागले असून कोणता उमेदवार निवडून येईल याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत.

संपूर्ण देशात बहुचर्चित समजल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदार संघातील निकाल काय लागेल, यावर सध्या चौकाचौकात, गल्ली बोळातील कट्ट्यावर अंदाज व्यक्त केले जात आहेत. माढा लोकसभा मतदार संघात सहा मतदार संघ आहेत. यापैकी करमाळा शिवसेना, सांगोला शेकाप, माण-खटाव कॉंग्रेस, फलटण, माळशिरस, माढा या मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या झालेल्या निवडणुकीत बऱ्याच घडामोडी घडल्या. मग त्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली. त्यांना मानणारा गट भाजपकडे वळवून मताधिक्‍य देण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली.

त्यातच मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक संजयमामा शिंदे राष्ट्रवादीचे उमेदवार बनले. त्यामुळे मोहिते-पाटील यांनी माढ्याच्या लढतीकडे पूर्ण फोकस करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच अकलुजमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे माढा लोकसभा मतदार संघात वेगळे चित्र पाहायला मिळाले. तसेच माण-खटावचे कॉंग्रेसचे आ. जयकुमार गोरे यांनी आघाडीच्या धर्माला तिजलांजली देवून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मताधिक्‍य देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. निंबाळकरांना मताधिक्‍य देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचे दिसून आले. दुसरीकडे त्यांचेच कट्टर विरोधक व बंधू शेखर गोरे यांनीही भाजपच्या निंबाळकर यांनाच पाठिंबा जाहीर करत मताधिक्‍क्‍य देण्यासाठी यंत्रणा कामाला लावली होती. त्यामुळे माण-खटाव तालुक्‍यातून भाजपला मताधिक्‍य मिळण्याची शक्‍यता आहे. तरी ग्रामीण मतदारांनी नेमका काय कौल दिला आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

माळशिरस व माण-खटाव सोडले तर करमाळा, सांगोला, माढा, व फलटण तालुक्‍यातून राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांना मताधिक्‍क्‍य मिळू शकते, असाही अंदाज मतदारांतून व्यक्त केला जात आहे. कारण माण-खटाव तालुक्‍यातील दलित व मुस्लिम मतदारांचा कौल हा बहुजन वंचित आघाडीकडे दिसून येत होता. त्यामुळे बहुजन वंचित आघाडी व इतर अपक्ष उमेदवार नेमकी कोणाची मते घेणार? कोणात्या उमेदवाराचा कोणत्या उमेदवाराला फटका बसणार याबाबत मोठे अंदाज लावले जात आहेत. निकाल हा 23 मे रोजी असल्यामुळे महिनाभर तरी हे तर्कवितर्क व अंदाज लावले जाणार असून खरे चित्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.