अग्रलेख : विरोधी पक्षांचा नेता कोण?

कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्‍त पुरोगामी आघाडी म्हणजेच यूपीए सध्या केंद्रीय राजकारणात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. सोनिया गांधी यांची तब्येत गेले काही महिने बरी नसल्याने यूपीएच्या नेतेपदी अन्य एखाद्या नेत्याची निवड करावी, अशी चर्चा सुरू झाली होती. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही जबाबदारी घ्यावी, अशा प्रकारची चर्चा पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्‍वभूमीवरच समोर आली होती. शरद पवार यांनी अत्यंत स्पष्टपणे हे नाकारले असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला विरोध करणारे जे विविध राजकीय पक्ष आहेत त्यांना एकत्रपणे बांधून ठेवणारा त्यांचा नेता कोण, हा प्रश्‍न मात्र कायम राहत आहे. भारताच्या राजकारणात जेव्हा एनडीए आणि यूपीए या दोन आघाड्या उदयास आल्या तेव्हा एनडीएतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी नेहमी नेतृत्व केले होते आणि कॉंग्रेस प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या यूपीएचे नेतृत्व कॉंग्रेस नेत्यांपैकी कोणीतरी केले होते. 

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे नेतृत्व करत असल्याने एनडीएचे नेतेपद त्यांच्याकडेच आहे, तर कॉंग्रेस पक्ष प्रमुख विरोधी पक्ष असल्याने या पक्षाचे नेते म्हणून सोनिया गांधी यांच्याकडेच यूपीए आघाडीचे नेतृत्व आहे, पण विद्यमान राजकारणामध्ये विरोधी पक्षांनी प्रभावी भूमिका बजावण्याची गरज असताना देशातील विरोधी पक्ष प्रभावहीन पद्धतीने काम करत असल्याचे समोर आल्याने विरोधी आघाडीला एखादा सक्षम नेता असावा, अशी चर्चा सुरू झाली असावी. 

कॉंग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे महत्त्व कमी करण्यासाठी यूपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार करणार असल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्याचा आरोप सुस्पष्टपणे कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता, हे याठिकाणी विसरता येणार नाही. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबतही काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावरही काही कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना समजून घेण्यास शरद पवार कमी पडत असल्याची टीका केली होती.

राहुल गांधी यांचे नेतृत्व आणि राजकारणातील त्यांचा प्रत्यक्ष सहभाग याविषयी नेहमीच चर्चा होत असली, तरी आज विरोधी आघाडीला सक्षम आणि कणखर असा विरोधी पक्ष नेता नाही. यूपीएच्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदी डॉ. मनमोहन सिंग असताना विरोधी पक्षांच्या बाकावर सुषमा स्वराज, राजनाथ सिंग या प्रकारचे दिग्गज नेते बसले होते आणि सरकारला हैराण करण्याचे काम करत होते. एनडीएचे इतर मित्र पक्षही भाजपाला या कामांमध्ये मदत करत होते; पण आज लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेता कोण आहे, हे पटकन कोणालाही आठवणार नाही अशी परिस्थिती आहे. 

यूपीएचे घटक पक्ष किंवा मित्रपक्ष म्हणणाऱ्या ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू, तेजस्वी यादव यांच्यासारखे नेते कॉंग्रेसच्या एक मुखी नेतृत्वाखाली एकत्र येण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. यापैकी प्रत्येक नेत्याला आपल्या नेतृत्वाची उंची वाढवायची असल्याने अन्य कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पातळीवर काम करावे, असे कोणालाही वाटत नाही. हीच यातील मुख्य मेख आहे. खरेतर सध्याची परिस्थिती पाहता विरोधी पक्षांना एखाद्या कणखर आणि सक्षम नेत्याची गरज आहे. यात कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. कॉंग्रेस पक्षाचे नाव मोठे असल्याने आणि या पक्षाचा इतिहासही चांगला असल्याने याच पक्षाच्या एखाद्या नेत्याने ही जबाबदारी घेण्याची खरी गरज आहे. मुळात कॉंग्रेस पक्षाला सध्या पूर्ण काळचा अध्यक्ष मिळत नसल्याने सोनिया गांधी आता हंगामी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. 

नरेंद्र मोदी यांना योग्य पर्याय म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते ते राहुल गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर, त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने नेतृत्वाची ही पोकळी निर्माण झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची गेल्या काही वर्षांतील मानसिकता पाहता आता कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याच्या बाहेरील एखाद्या नेत्याने पाहावे असे त्यांचे मत दिसते. पण दुसरीकडे कॉंग्रेसच्या नेत्यांना मात्र कॉंग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्याबाहेर जाऊ नये, असे वाटत आहे. त्यातूनच नेतृत्वाचा हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने आपल्या नेतृत्वाचा प्रश्‍न जर व्यवस्थित सोडवला, तर आपोआपच विरोधी पक्षांचा नेता कोण, या प्रश्‍नाचे उत्तर मिळणार आहे. देशाचे दिवंगत माजी राष्ट्रपती आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या आत्मचरित्रातही प्रणव मुखर्जी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर काही शंका निर्माण केल्या होत्या आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत पक्षसंघटना कमकुवत झाल्याचा दावा केल्याची माहिती समोर येत आहे. 

प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला जर कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबद्दल तेव्हाच शंका होती, तर आताच कॉंग्रेसच्या नेत्यांनी जागे होण्याची वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारला कणखर आणि सक्षम पर्याय उपलब्ध करायचा असेल आणि निवडणुकीत एनडीएला मोठ्या प्रमाणात आव्हान उभे करायचे असेल, तर विरोधी आघाडी तेवढीच मजबूत, सशक्‍त आणि सक्षम असण्याची गरज आहे. अशा आघाडीचा नेता जर सक्षम धोरणी आणि निवडणुकीचे राजकारण जिंकण्याची क्षमता असणारा असेल तरच त्याला विद्यमान राजकारणात यश मिळण्याची शक्‍यता विचारात घेता येईल. आपण यूपीएचे नेतृत्व करण्यास उत्सुक नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर आता विरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार, हा प्रश्‍न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. 

हाच याठिकाणी महत्त्वाचा विषय आहे. राहुल गांधी यांनीच आता पुढाकार घेऊन पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येऊन पुन्हा एकदा सकारात्मक सुरुवात केली तरच विरोधी पक्षांना योग्य नेता मिळण्याची शक्‍यता निर्माण होईल. अन्यथा विरोधी पक्षांचा नेता कोण, या प्रश्‍नाचे उत्तर कधीही मिळणार नाही. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.