खासदारकीची माळ नक्की कोणाच्या गळ्यात?

जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघणार
अंकुश महाडिक

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला काही दिवसांचा अवधी बाकी असताना सातारा लोकसभा मतदार संघातून उमेदवार कोण असणार? याची चर्चा सर्वत्र रंगू लागली. युती होणार नाही असे वाटत असताना सेना भाजपची युती झाल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस विनाअट एकत्र आली. युती आणि आघाडी यांनी आपआपल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरवात केली. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या कार्यकर्त्यांनी तर आमच्या साहेबांच्या एवढा ताकतीचा उमेदवार दुसरा कोणीच नाही असे दावे केले, कोण असेल सातारा लोकसभा मतदारसंघाचा 2019 चा खासदार हे येणार काळच सांगेल.

विद्यमान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून विजयाची हॅटट्रीक करण्यास इच्छुक आहेत. यासाठी जोरदार मोर्चा बांधणी बैठका, नाराजांची मनधरणी सुरु आहे यामध्ये त्यांना कितपत यश येते, याचे उत्तर लवकरच मिळेल. परंतु 2009 च्या निवडणुकीच्यावेळी असणारा उत्साह 2014 ला दिसला नाही आणि 2014 चा उत्साह आज दिसत नाही. याचाही कुठेतरी विचार करणे गरजेचे आहे. मुळात 2009 साली महाराजसाहेबांनी भूमाता दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा ढवळून काढलेला होता.

पवारसाहेबांनी सुध्दा याची दखल घेऊन लोकसभेची उमेदवारी दिलेली होती. परंतु दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेचसे पाणी गेले आहे. जनसंपर्काच्या अभावामुळे, मतदार संघातील बऱ्याचशा विभागातील कमी पडलेला विकास असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 2009 च्या निवडणुकीवेळी ज्या मातब्बर नेते मंडळीनी महाराजांना तिकीटापासून निवडून देण्यापर्यंत मदत केली, त्याच मातब्बर मंडळींनी आज तिकीट मिळू नये म्हणून विडा उचला आहे. त्यातूनही जर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने जरी तिकीट दिले, तरी दगाबाजी करण्यास कमी पडणार नाहीत. एकूणच काय तर जेवढी वाटते तेवढी ही लढाई महाराजसाहेबांसाठी सोपी नाही हे नक्की.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतून दुसरे नाव चर्चेत आहे ते माजी खासदार श्रीनिवास पाटीलसाहेब यांचे, ज्यांनी 1999 ते 2009 पर्यंत कराड लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. एक प्रशासकीय अधिकारी ते खासदार आणि पुढे सिक्कीम राज्याचे राज्यपाल हा त्यांचा प्रवास थक्क करून टाकणारा आहे. राजकारणाचा कसलाही वारसा नसलेले हे व्यक्तीमत्व केवळ शरद पवाररसाहेबांच्या शब्दावर उच्चपद नोकरीचा राजीनामा देऊन समाजसेवेत स्वतःला एवढे झोकून देतात आणि 10 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत जनसामान्यांच्या मनात आपले अटळ असे स्थान निर्माण केले. परंतु मतदारसंघ पुनर्रचनेत कमी झालेल्या कराड लोकसभा मतदार संघामुळे आणि पक्षांतर्गत असलेल्या विरोधामुळे 2009 च्या लोकसभा उमेदवारीपासून त्यांना लांब ठेवले गेले.

खरंतर श्रीनिवास पाटीलसाहेबांची वाढती लोकप्रियता ही जिल्ह्यातील काही मंडळींना खटकत होती. त्यातच सातारा विधानसभा मतदारसंघ शिवेंद्रराजे यांच्यासाठी सुरक्षित करायचा असेल तर उदयनराजे यांना लोकसभेत पाठविणे गरजेचे आहे, हे ओळखून या मातबर मंडळींनी श्रीनिवास पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघात चालणार नाहीत हे पवारसाहेबांना पटवून दिले आणि जनसामान्यांच्या नेतृवाला बाजूला केले. परंतु बदलत्या परिस्थितीचा विचार करता पक्षाने जर उमेदवारी दिली तर पुन्हा श्रीनिवास पाटील खासदार होतील यात काहीच शंका नाही. युतीचे उमेदवार म्हणून खंडाळ्याचे सुपुत्र पुरूषोत्तम जाधव हे सुध्दा इच्छुक आहेत.

युतीमधून दुसरे एक नाव सध्या जोरदार चर्चेत आहे ते ढेबेवाडीचे सुपुत्र माथाडी नेते माजी आ. नरेंद्र पाटील यांना जर युतीमधून उमेदवारी दिली आणि समोर श्रीनिवास पाटील सोडून जर दुसरे कोण उमेदवार असेल तर मात्र नरेंद्र पाटील यांना दिल्ली गाठणे फारसे अवघड नाही. याचे कारण असे जिल्ह्यात माथाडीची फार मोठी संघटना आहे. त्याचबरोबर अनेक पक्षाच्या मातब्बरांचे बरोबर त्यांचे असणारे घनिष्ट संबंध. जिल्ह्यातील सेना भाजपची वाढलेली ताकद, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराजी, याचबरोबर पाटीलसाहेबांचे संघटन कौशल्य, यासारख्या अनेक जमेच्या बाजू त्यांच्या पत्त्यावर पडणाऱ्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही निवडणूक नक्की जिल्ह्याच्या राजकारण ढवळून काढणारी ठरेल यात शंकाच नाही 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.