विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

कोचिंग क्‍लासेसचे फायर ऑडिटही होत नसल्याचे वास्तव


सुरत येथील आगीच्या घटनेनंतर पुण्यातही धुमसतोय प्रश्‍न


इमारतींत आपत्कालिन व्यवस्था टांगणीला, प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे – सुरत येथे खासगी क्‍लासला लागलेल्या आगीत 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर पुण्यातील खासगी कोचिंग क्‍लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उभा राहिला आहे. बहुतांश क्‍लासेस व्यापारी संकुलाऐवजी निवासी इमारतीत चालविले जात आहेत. क्‍लासेसकडून फायर ऑडिट होत नाही. भरमसाठ शुल्क घेतल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षिततेची जबाबदारी क्‍लासचालकांची आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्थेची पूर्तता करण्यासाठी क्‍लासेसने प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्‍त करत आहेत.

शहरात दहावी, बारावी, जेईई, नीट आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एमपीएससी, यूपीएससी क्‍लाससोबतच शेकडो अभ्यासिका व क्‍लासेस आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व पेठांमध्ये क्‍लासेस मोठ्या संख्येने आहेत. त्याच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राज्याच्या विविध भागांतून पुण्यात येणाऱ्यांची संख्या तुलनेने अधिक आहेत. त्यामुळे जेईई, नीटसोबत स्पर्धा परीक्षा क्‍लासेसकडे विद्यार्थ्यांची पसंती वाढली आहे. मात्र, अत्यंत गजबललेल्या इमारतीत हे क्‍लास सुरू असून, त्यात विद्यार्थ्यांची सुरक्षाही रामभरोसे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. क्‍लासमध्ये एखादी आगीची घटना टाळता येण्याच्या दृष्टीने कोणतीच आपत्कालिन व्यवस्था नाही. त्यामुळे क्‍लासला जाणारी मुले खरीच सुरक्षित आहेत, का प्रश्‍न निर्माण होत आहे.

…तरीही शहाणपण सुचेना
यापूर्वी तामिळनाडूतील कुंभकोण येथे प्राथमिक शाळेला लागलेल्या आगीत होरपळून 94 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना 16 जुलै 2014 रोजी घडली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेविषयी बरीच जागृती झाली. कालांतराने तो विषय मागे पडला. आता सुरतमध्ये आगीची घटना घडली, त्यात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गांभीर्याने समोर येत आहे. सुरतसारखी घटना पुण्यासह कोठेही घडू शकते, त्या पार्श्‍वभूमीवर वेळीच दक्षता घेत राज्य शासनाने कडक पावले उचलावीत, अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञांतून होत आहे.

खासगी कोचिंग क्‍लासेसमध्ये अग्निशमन यंत्रणा असते. काही ठिकाणी तशी व्यवस्था असेलच असे नाही. मात्र, आगीची घटना घडल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा, हेच बहुधा माहित नसते. त्यासाठी संबंधितांना प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. तसेच शहरात मोठ्या इमारतीत कोचिंग क्‍लासेस सुरू असतात. अशा वेळी अधूनमधून “मॉक ड्रिल’ होणे गरजेचे आहे. त्यावरून विद्यार्थी किती सुरक्षित आहेत, याची वस्तुस्थिती कळेल.
– डॉ. वसंत काळपांडे, माजी शिक्षण संचालक.


खासगी कोचिंग क्‍लासेस ही समांतर शाळेसारखी फोफावलेली यंत्रणा आहे. समांतर व्यवस्था म्हटले, की क्‍लासमध्ये शाळेसारखी सर्व सुविधा असणे महत्त्वाचे आहे. कोचिंग क्‍लासवाले भरमसाठ शुल्क घेतात. परंतु एकदा की शुल्क घ्यायचे ठरले, की विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आपोआप येते. गुणवत्तेचे शिक्षण देणे, उत्तम आसन व्यवस्था, पाणी पिण्याची योग्य व्यवस्था, अभ्यासिका अथवा ग्रंथालय, विद्यार्थ्यांना आगीपासून सुरक्षित ठेवणे, या सर्व गोष्टीची नैतिक जबाबदारी क्‍लासचालकांची आहे. त्यासाठी शासनाने कडक कायदा करून, दरवर्षी खासगी क्‍लासची तपासणी करणे आवश्‍यक आहे. सुविधा उपलब्ध न करणाऱ्या कोचिंग क्‍लास बंद केले पाहिजेत.
– अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here