Mohammed Yunus As Interim Government Chief| बांगलादेशात गेल्या काही दिवसांत नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. 2009 पासून सातत्याने बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणाऱ्या 76 वर्षीय शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून पळून जावे लागले. यानंतर आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह तिन्ही सेना प्रमुखांनीही या बैठकीला हजेरी लावली होती. बांगलादेशात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.
कोण आहे मोहम्मद युनूस?
मोहम्मद युनूस यांचा जन्म 28 जून 1940 रोजी चितगाव येथे झाला. बांगलादेशसह जगभरात ते सामाजिक उद्योजक, बँकर, अर्थशास्त्रज्ञ आणि सामाजिक नेते म्हणून ओळखले जातात. 2006 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली.
युनूस हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे कट्टर विरोधक
मोहम्मद युनूस हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे कट्टर विरोधक आहेत. ‘बँकर ऑफ द पुअर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनूस आणि त्यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेला 2006 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. 1983 मध्ये त्यांनी ग्रामीण बँकेची स्थापना केली. त्यांनी ग्रामीण भागातील गरीबांना 100 डॉलर्सपेक्षा कमी कर्ज देऊन लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत केली. यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान उंचावण्यात यश मिळाले.
अर्थशास्त्राचे प्राध्यापक
याशिवाय युनूस यांनी 2012 ते 2018 पर्यंत स्कॉटलंडमधील ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम केले. ते यापूर्वी चितगाव विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी ग्रामीण अमेरिका आणि ग्रामीण फाउंडेशनमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 1998 ते 2021 पर्यंत ते संयुक्त राष्ट्र फाउंडेशनचे बोर्ड सदस्य होते.
2007 मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, यावरून हसीना यांनी युनूस यांच्यावर ‘गरिबांचे रक्त शोषल्याचा’ आरोप केला होता. 2011 मध्ये हसिना सरकारनं त्यांना ग्रामीण बँकेच्या प्रमुख पदावरून हटवलं. त्यानंतर सरकारनं सांगितलं की, 73 वर्षीय युनूस कायदेशीर सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ते या पदावर आहेत. त्यानंतर लोकांनी त्यांच्या बडतर्फीचा निषेध केला होता. या निषेधार्थ हजारो बांगलादेशींनी मानवी साखळी तयार केली.
युनूस यांच्यावर केले हे आरोप
जानेवारीमध्ये युनूस यांना श्रम कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.जूनमध्ये, बांगलादेशच्या न्यायालयानं युनूस आणि इतर 13 जणांवर स्थापन केलेल्या दूरसंचार कंपनीतील कामगारांसाठी कल्याण निधीतून 2 डॉलर्स दशलक्ष गहाळ केल्याच्या आरोपावरही खटला चालवला. परंतु मोहम्मद युनूस यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि मला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे सांगितले.
हेही वाचा:
बांगलादेश हिंसाचारावर धीरेंद्र शास्त्रींचे मोठे वक्तव्य ; म्हणाले,”त्याठिकाणची परिस्थिती…”